Coronavirus | Representational Image | (Photo Credits: Pixabay)

कोरोना विषाणूच्या (Coronavirus) संसर्गाने आधीच भारतीय अर्थव्यवस्थेचे कंबरडे मोडले आहे. आता या कोविड-19 साथीच्या आजाराचा गंभीर परिणाम भारताच्या शिक्षण क्षेत्रावर (Education Sector) झाल्याचे दिसत आहे. केजी ते बारावी पर्यंतच्या 1000 हून अधिक शाळा देशभरात विक्रीसाठी सज्ज आहेत. पुढील दोन ते तीन वर्षांत त्यांची विक्री करुन सुमारे साडेसात हजार कोटी रुपये उभे केले जाऊ शकतात. टाईम्स ऑफ इंडियाने याबाबत वृत्त दिले आहे. शिक्षण पायाभूत क्षेत्रातील आघाडीची कंपनी सेरेस्ट्रा वेंचर्सने (Cerestra Ventures) गोळा केलेल्या आकडेवारीवरून असे दिसून आले आहे की, विक्रीसाठी काढलेल्या बहुतांश शाळांची वार्षिक फी 50,000 आहे.

भारतातील सुमारे 80% विद्यार्थी याच फी स्लॅब असलेल्या शाळांमध्ये शिकत आहेत. सेरेस्ट्राचे भागीदार विशाल गोयल म्हणाले की, ‘अनेक राज्य सरकारांनी फी वसुलीची मर्यादा निश्चित केली आहे, मात्र शाळांना शिक्षकांना पगार व इतर खर्चही आहेत. यामुळे खासगी शाळांची आर्थिक परिस्थिती बिकट झाली आहे. यामुळे  मोठ्या शाळांच्या चेनला आपल्या कर्मचार्‍यांचे पगार 70% कमी करावे लागले आहेत.’

गोयल पुढे म्हणाले, ‘भविष्यात परिस्थिती कशी असेल या संभ्रमामुळे या शाळांना निधी मिळण्याची शक्यता नाही. यामुळे अशा शाळांच्या अडचणी वाढल्या आहेत.’ गोयल यांच्याकडे, केजी ते बारावी पर्यंतचे शिक्षण उपलब्ध असणाऱ्या 30-24 शाळा आहेत. सध्या या शाळांमध्ये 1,400 कोटी रुपयांची गुंतवणूक आवश्यक आहे. कर्नाटक, महाराष्ट्र आणि तेलंगणामध्ये किमान 20 ते 25 शाळा संभाव्य खरेदीदारांच्या शोधात आहेत, अशी माहिती लोएस्ट्रो अ‍ॅडव्हायझर्सचे व्यवस्थापकीय भागीदार राकेश गुप्ता यांनी दिली. (हेही वाचा: कोविड-19 संकट काळात पार पडणाऱ्या परीक्षांसाठी आरोग्य मंत्रालयाने जारी केल्या नव्या मार्गदर्शक सूचना)

कंपनीने 2019 च्या सर्वात मोठ्या शाळा अधिग्रहणात मदत केली होती. हाँगकाँग स्थित नॉर्ड एंजलिया एज्युकेशन द्वारा ओक्रीज इंटरनेशनलचे अधिग्रहण झाले. या चेनच्या हैदराबाद, विशाखापट्टणम, बेंगलुरु आणि मोहाली येथे शाळा आहेत ज्या 1600 कोटी रुपयांना विकल्या गेल्या. आता जेव्हा त्यांची विक्री करायची आहे, तेव्ह खरेदीदार 30 ते 40 टक्के कमी किंमत देत आहेत.