Varun Gandhi On Kangana Ranaut | (Photo Credit: Archived, edited, representative images)

भारताला 1947 मध्ये मिळालेले स्वातंत्र्य हे स्वातंत्र्य नव्हते तर ती भीक होती. भारताला खऱ्या अर्थाने 2014 मध्ये स्वातंत्र्य मिळाले, असे विक्षिप्त उद्गार काढणाऱ्या अभिनेत्री कंगना रनौत (Kangana Ranaut) हिच्यावर भाजप (BJP) खासदार वरुण गांधी (Varun Gandhi) यांनी जोरदार टीकास्त्र सोडले आहे. वरुण गांधी यांनी कंगना रनौत हिच्या वक्तव्याचा एक व्हिडिओ ट्विटरवर शेअर करत म्हटले आहे की, 'महात्मा गांधी यांच्या त्याग आणि तपश्चर्येचा हा अपमान आहे. कधी त्यांच्या मारेकऱ्याचा सन्मान आणि आता तर शहीद मंगल पाण्डेय यांच्यापासून ते थेट राणी लक्ष्मीबाई, भगत सिंह, चंद्रशेखर आजाद, नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्यासारख्या असंख्य स्वातंत्र्य सेनानींच्या बलितानाचा तिरस्कार. या विचारांना मी वेडेपणा म्हणून की देशद्रोह?' , असा सवाल वरुण गांधी यांनी केला आहे.

कंगणा रनौत हिने टाइम्स नाऊ या खासगी वृत्तवाहिनीशी संबंधित एका कार्यक्रमात भारतीय स्वातंत्र्याबद्दल उद्गार काढले होते. कंगना रनौत हिने म्हटले की, भारताला मिळालेले स्वातंत्र्य हे खरे स्वातंत्र्य नव्हते. ती भिक होती. खरे स्वातंत्र्य 2014 ला मिळाले. कंगनाच्या या वक्तव्यावरुन सोशल मीडिया आणि विविध स्तरांमधून टीका होत आहे. (हेही वाचा, Varun Gandhi attacks on BJP: 'शेतकऱ्याचा छळ बंद करा!' वरुण गांधी यांचा भाजपवर निशाणा; अटल बिहारी वाजपेयी यांच्या भाषणाचा व्हिडिओ केला ट्विट)

ट्विट

उल्लेखनीय असे की, कंगना रनौत हिला याच महिन्यात केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजप प्रणित एनडीए सरकारने पद्मश्री देऊन सन्मानित केले आहे. 34 वर्षीय अभिनेत्री कंगना रनौत ही आपल्या वादग्रस्त आणि भडकावू विधानांबद्दल प्रसिद्ध आहे. याच कारणावरुन तिला ट्विटरने ब्लॉक केले आहे. या आधीही ती वादग्रस्त विधानांमुळे जोरदार चर्चेत आली होती.