Andhra Pradesh Shocker: आंध्र प्रदेशातील पश्चिम गोदावरी जिल्ह्यात एका महिलेला एका अनोळखी पुरुषाचा मृतदेह सापडल्याने तिला धक्काच बसला आहे. पश्चिम गोदावरी जिल्ह्यातील उंडी मंडलातील येंदागंडी गावात ही भीषण घटना घडली. नागा तुलसी नावाच्या महिलेने घर बांधण्यासाठी आर्थिक मदतीसाठी क्षत्रिय सेवा समितीकडे अर्ज केला होता. समितीने महिलेला फरशा पाठवल्या होत्या. या बांधकामासाठी महिलेने पुन्हा क्षत्रिय सेवा समितीकडे मदतीचे आवाहन केले. समितीने विद्युत उपकरणे देण्याचे आश्वासन दिले होते. अर्जदाराला व्हॉट्सॲपवर दिवे, पंखे, स्विचेस यांसारख्या वस्तू पुरवल्या जातील असा संदेश आला होता. गुरुवारी रात्री एका व्यक्तीने महिलेच्या दारात एक बॉक्स दिला आणि त्यात विद्युत उपकरणे असल्याचे सांगून तो निघून गेला. नंतर तुळशीने पार्सल उघडले आणि त्यात एका व्यक्तीचा मृतदेह पाहून धक्काच बसला. या संपूर्ण घटनेने त्यांचे कुटुंबीयही घाबरले.
संपूर्ण प्रकरणाची माहिती तातडीने पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून कारवाई करत मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवला. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. जिल्हा पोलिस अधीक्षक अदनान नईम अस्मी यांनीही गावाला भेट देऊन प्रकरणाची चौकशी केली. पार्सलमध्ये एक पत्रही सापडले असून, त्यात १.३० कोटी रुपयांची मागणी करण्यात आली असून, मागणी पूर्ण न झाल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील, असा इशाराही कुटुंबियांना देण्यात आला आहे. पार्सल डिलिव्हरी करणाऱ्या व्यक्तीची ओळख पटवण्याचा प्रयत्न पोलिस करत आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा मृतदेह सुमारे ४५ वर्षांच्या व्यक्तीचा आहे. चार ते पाच दिवसांपूर्वी या व्यक्तीचा मृत्यू झाला असावा, असा पोलिसांचा अंदाज आहे. पोलिसांनी मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवला आहे. हे खुनाचे प्रकरण आहे का, याचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत.