गोळवलकर गुरुजींचे कालबाह्य विचार संघाने सोडले: मोहन भागवत
आरएसएस सरसंघचालक मोहन भागवत (Photo Credits: PTI)

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ अर्थातच आरएसएसचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी हिंदू-मुस्लिम वादावर बुधवारी एक मोठे विधान केले. भागवत म्हणाले की, आम्ही एकाच देशाची मुले आहोत. भावा-भावांसारखे आहोत. सर्वांसोबतचा बंधूभाव आपण जपला पाहिजे. जे दूर गेले आहेत त्यांना आपण जोडून घेतले पाहिजे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या तीन दिवसीय व्याख्यानमालेचे आयोजन नवी दिल्लीतील विज्ञान भवनात करण्यात आले आहे. या व्याख्यानमालेचा बुधवारी तिसरा दिवस होता. यावेळी सरसंघचालक मोहन भागवत यांनी विविध विषयांव आपले विचार व्यक्त केले.

या कार्यक्रमादरम्यान, भागवत यांना गोळवलकर गुरुजींनी लिहिलेल्या 'बंच ऑफ थॉट्स' या पुस्तकात मुस्लिम समाजाचा शत्रू असा उल्लेख केल्याबद्दल प्रश्न विचारण्यात आला. तसेच, संघ या विचारांशी सहमत आहे का?, मुस्लिम समाजात संघाबाबत असलेली भीती कशी दूर करायची याबाबत प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नावर उत्तरादाखल बोलताना भागवत म्हणाले, आपण तर एकाच देशाची मुले आहोत. सर्वांनी मिळून बंधूभावाने राहिले पाहिजे. 'बंच ऑफ थॉट्स'मध्ये जे विचार व्यक्त केले आहेत ते तात्कालिक आहेत. ते प्रासंगिक रुपावर भाष्य करतात. त्यामुळे ते चिरंतन राहणारे नाहीत.

पुढे बोलताना भागवत म्हणाले, गोळवलकर गुरुजींचे जे विचार चिरंतन टिकणारे आहेत त्याचा एक संग्रह प्रकाशित झाला आहे. 'श्री गुरुजी व्हिजन आणि मिशन' यात गुरुजींचे तात्कालिन संदर्भ असलेले विचार काढून चिरंतन असणारे विचार प्रकाशित करण्यात आले आहेत. संघ हा कधीच बंधीस्त नव्हता. त्यामुळे जर हेगडेवार यांनी काही बोलले असेल तर, याचा अर्थ असा नाही की, तोच विचार घेऊन संघ पुढे जाईल. काळासोबत बऱ्याच गोष्टी बदलत जातात असेही भागवत म्हणाले.