Liver Transplant: देशात अल्पवयीन (Minors) व्यक्तींना अवयवदान (Organ Donation) करण्याची परवानगी नाही. अशा स्थितीत उत्तर प्रदेशातील एका 17 वर्षीय अल्पवयीन मुलाने वडिलांना अवयव दान करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) याचिका दाखल केली होती. मात्र, सर्वोच्च न्यायालयाच्या सुनावणीपूर्वीच त्याच्या आजारी वडिलांचा मृत्यू झाला.
वास्तविक, या 17 वर्षीय अल्पवयीन मुलाला त्याचे यकृत त्याच्या आजारी वडिलांना दान करायचे होते. परंतु जिवंत अल्पवयीनांना देशात अवयव दान करण्याची परवानगी नाही. मिळालेल्या माहितीनुसार, या अल्पवयील मुलाच्या आजीलाही आपल्या आजारी मुलाला आपले यकृत दान करायचे होते. मात्र, वैद्यकीय तपासणीनुसार ती फिट नव्हती. त्यामुळे तिला अवयवदान करता आले नाही. (हेही वाचा -Pune: ब्रेन डेड मुलीने लष्कराच्या जवानासह 5 जणांना दिले नवजीवन, किडनी, यकृत आणि डोळे केले दान)
अवयव दानासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका -
वडिलांना वाचवण्यासाठी अल्पवयीन तरुणाने सर्वोच्च न्यायालयात यकृत दानासाठी (Liver Transplant) अर्ज केला. आपल्या वडिलांची प्रकृती अत्यंत गंभीर असून यावेळी त्यांना तातडीने यकृत प्रत्यारोपणाची गरज असल्याचे अल्पवयीन तरुणाने आपल्या याचिकेत म्हटले होते. मला माझ्या वडिलांना यकृत द्यायचे आहे. ज्यावर न्यायालयाने म्हटले होते की, अल्पवयीन व्यक्ती त्याचे यकृत दान करू शकते की नाही हे पाहण्यासाठी त्याची प्राथमिक तपासणी संबंधित रुग्णालयात करण्यात यावी. याप्रकरणी काही निर्णय होण्यापूर्वीच तरुणाच्या वडिलांचा मृत्यू झाला.
जिवंत अल्पवयीनांना अवयवदान करण्याची परवानगी द्यायची की नाही, यावरून आता नवा वाद सुरू झाला आहे. कारण कायद्यानुसार, कोणताही अल्पवयीन व्यक्ती मृत्यूपूर्वी अवयवदान करू शकत नाही.