Suicide | (Photo Credits: unsplash.com)

Gujarat Mass Suicide Case: गुजरातमधील (Gujarat) सुरतमध्ये (Surat) एक हृदय पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. एकाच कुटुंबातील सात जणांनी आत्महत्या (Suicide) केली आहे. मृतांमध्ये तीन मुलांचा समावेश आहे. ही घटना सुरतमधील पालनपूर जकातनाक रोडवर घडली. शनिवारी सकाळी संपूर्ण कुटुंबाने आत्महत्या केली. विष प्राशन केल्याने कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू झाल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. यातील एका सदस्याने गळफास घेतला. मनीष सोळंकी, त्याची पत्नी रीता, मनीषचे वडील कानू, आई शोभा आणि दिशा, काव्या आणि कुशल अशी तीन मुलं अशी मृतांची नावे आहेत.

मनीषचा मृतदेह पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. मीडिया रिपोर्ट्सनुसार, पोलिसांनी घटनास्थळावरून एक सुसाईड नोटही जप्त केली आहे. या सुसाईड नोटमध्ये मनीष सोलंकी यांनी आर्थिक संकटाबाबत नमूद केले आहे. (हेही वाचा - Latur Suicide Case: 'दुष्काळ जगू देत नाही, आरक्षण शिकू देत नाही' स्टेटस ठेवत 26 वर्षीय ग्रामपंचायत सदस्याची आत्महत्या)

मनीषने कुटुंबातील इतर सदस्यांची विष प्राशन करून हत्या केली आणि नंतर गळफास घेऊन स्वत: ला संपवलं. मनीष सोलंकी यांचा फर्निचरचा व्यवसाय असून त्यांच्यासोबत 35 कर्मचारी काम करत होते. शनिवारी मनीषसोबत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी त्याच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने त्यांनी त्याच्या घरी जाऊन तपासणी केली. स्थानिक लोकांनी दरवाजा तोडून घरात प्रवेश केला असता सामूहिक आत्महत्येची घटना उघडकीस आली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवून घटनेचा तपास सुरू केला.

सुरतचे डीसी राकेश बारोट यांनी सांगितले की, कुटुंबातील सात जणांनी आत्महत्या केली आहे. मृत्यूपूर्वी सुसाईड नोट लिहिली असून आम्ही त्याचा तपास करत आहोत. मृत कुटुंब आर्थिक संकटात असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. आम्ही या घटनेचा अधिक तपास करत आहोत.