Corona Second Wave in India: भारतात कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेत 300 पत्रकारांचा मृत्यू; इन्स्टिट्यूट ऑफ परसेप्शन स्टडीजमध्ये खुलासा
journalists (PC - Pixabay)

Corona Second Wave in India: गेल्या वर्षी कोरोना विषाणूमुळे डॉक्टर, आरोग्य कर्मचारी, पोलिस यासारख्या फ्रंट-लाइन कामगारांना आपला जीव गमवावा लागला. त्यामुळे भारतात लसीकरण मोहिम सुरू झाल्यानंतर लगेचचं या कामगारांना लस देण्यात आली. त्याचा चांगला परिणाम झाला. कोरोनाच्या दुसर्‍या लाटेत अनेकांनी जीव गमावला आहे. कोरोनाच्या पहिल्या आणि दुसर्‍या लाटेचे रिपोर्टिंग करणाऱ्या पत्रकारांना फ्रंट-लाइन कामगार समजले गेले नाही. तसेच त्यांना लसीकरणासाठी प्राधान्य देण्यात आले नाही. याचाचं परिणाम म्हणून कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत आतापर्यंत अनेक नामांकित पत्रकारांसह विविध राज्यांतील 300 हून अधिक मीडियाकर्मींना आपला जीव गमवावा लागला आहे. एप्रिल महिन्यात दररोज सरासरी तीन पत्रकारांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. मे महिन्यात ही सरासरी दररोज चारवर पोचली. (वाचा - India COVID19 Update: भारतात कोरोनाचे आणखी 2,63,533 रुग्ण आढळले असून गेल्या 24 तासात 4329 जणांचा बळी)

कोरोनाच्या दुसर्‍या लाटेत देशातील अनेक ज्येष्ठ पत्रकारांचा मृत्यू झाला. जिल्हा, शहर, खेड्यात काम करणारे सर्व पत्रकारदेखील या प्राणघातक विषाणूच्या समोर हरले. दिल्लीस्थित इन्स्टीट्यूट ऑफ परसेप्शन स्टडीजच्या (Institute of Perception Studies) अहवालानुसार, एप्रिल 2020 ते 16 मे 2021 या कालावधीत कोरोना संसर्गामुळे 238 पत्रकारांचा मृत्यू झाला आहे. (वाचा - Coronavirus Pandemic in India: कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेत 269 डॉक्टरांचा मृत्यू; इंडियन मेडिकल असोसिएशनने जारी केली आकडेवारी)

मे महिन्यात दररोज चार पत्रकारांचा मृत्यू -

या अहवालात म्हटले आहे की, एप्रिल 2020 ते 31 डिसेंबर 2020 या काळात कोरोनाच्या पहिल्या लाटेत 56 पत्रकारांचा मृत्यू झाला होता, पण दुसरी लाट अधिक भयानक ठरली. 1 एप्रिल 2021 ते 16 मे दरम्यान 171 पत्रकार मरण पावले. उर्वरित 11 पत्रकारांचा जानेवारी ते एप्रिल दरम्यान मृत्यू झाला. संस्थेच्या रेकॉर्डमध्ये 82 पत्रकारांची नावे आहेत, ज्यांची पडताळणी झालेली नाही. नेटवर्क ऑफ वुमन इन मीडिया इंडियानुसार, कोरोना संसर्गामुळे जवळपास 300 पत्रकारांचा मृत्यू झाला आहे. ट्विटरवर सध्या हा अहवाल मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे.

कोरोनामुळे 300 हून अधिक पत्रकारांचा मृत्यू

इन्स्टिट्यूट ऑफ परसेप्शन स्टडीजच्या अहवालात अशा सर्व पत्रकारांचा समावेश आहे, ज्यांना क्षेत्रात बातमी गोळा करताना किंवा कार्यालयांमध्ये काम करताना कोरोनाची लागण झाली होती. यात त्यांचा मृत्यू झाला. यात माध्यम संस्था, स्ट्रिंगर, स्वतंत्ररित्या काम करणारे, फोटो जर्नलिस्ट आणि सिटिजन जर्नलिस्टचा समावेश आहे.

संस्थेचे संचालक डॉ. कोटा नीलिमा यांनी आजतक या वृत्तवाहिनीला सांगितले की, कोरोनामुळे आतापर्यंत 300 हून अधिक पत्रकार मरण पावले आहेत, त्यापैकी आम्ही आतापर्यंत 238 जणांना व्हेरिफाय करू शकलो आहोत. इतरांची चौकशी सुरू आहे. या आकडेवारीनुसार उत्तर प्रदेशात 37 पत्रकारांच्या मृत्यूची नोंद झाली आहे, तर दक्षिण भारतात तेलंगणात सर्वाधिक पत्रकारांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. यानंतर दिल्लीत 30, महाराष्ट्रात 24, ओडिशामध्ये 26, मध्य प्रदेशात 19 पत्रकारांचा मृत्यू झाला आहे.

अहवालानुसार, दुसऱ्या लाटेत 41 ते 50 वर्षे वयोगटातील पत्रकार कोरोनाचा सर्वाधिक बळी ठरले. एकूण मृत्यूंपैकी त्यांची संख्या जवळपास 31 टक्के आहे. कोरोना संसर्गामुळे मरण पावलेले सुमारे 55 टक्के पत्रकार प्रिंट मीडियामधील, 25 टक्के टीव्ही व डिजिटल माध्यमातील आणि 19 टक्के स्वतंत्र पत्रकारितेतील होते.