IFFCO Plant ( फोटो क्रेडिट- Wikimedia Commons)

IFFCO Plant Gas Leakage in Prayagraj: प्रयागराजमधील (Prayagraj) फूलपूर येथे इंडियन फार्मर्स फर्टिलायझर कोऑपरेटिव्ह लिमिटेड (IFFCO) येथे अमोनिया गॅस गळतीमुळे दोन अधिकाऱ्यांचा मृत्यू झाला. या अपघातात सुमारे 15 कर्मचाऱ्यांची प्रकृती बिघडली आहे. जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. येथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. अहवालानुसार, IFFCO च्या युरिया प्रॉडक्शन युनिटमध्ये गॅस पाईप फुटल्यानंतर हा अपघात झाल्याचं म्हटलं जात आहे. या अपघातामागील कारणांबाबत अद्याप अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.

मंगळवारी रात्री अकराच्या सुमारास हा अपघात झाला. नाईट शिफ्ट दरम्यान, नेहमीप्रमाणे दोन युनिटमध्ये काम सुरू होते. अचानक गॅस गळती झाल्याच्या बातमीनंतर कंपनीत गोंधळ उडाला. यावेळी उपस्थित असिस्टंट मॅनेजर व्ही.पी.सिंग यांनी गळती थांबविण्याचा प्रयत्न केला. मात्र, यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांना वाचवण्यासाठी आलेला आणखी एक अधिकारी अभयनंदनदेखील गॅस गळतीचा शिकार झाला. (हेही वाचा -New Coronavirus Strain: ब्रिटनहून भारतात आलेले 20 प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह; देशात भीतीचं वातावरण)

दरम्यान, या अपघातानंतर कंपनीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी आपला जीव वाचवण्यासाठी पळून जाण्यास सुरुवात केली. परंतु, गॅस गळतीमुळे अनेक कर्मचारी तेथेच बेशुद्ध पडले. सध्या तज्ञांची टीम घटनास्थळी दाखल झाली आहे. या घटनेनंतर अपघाताची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहे.