New Coronavirus Strain: ब्रिटनमध्ये आढळलेल्या नव्या कोरोना व्हायरसमुळे (Coronavirus) संपूर्ण जगात एकच खळबळ उडाली आहे. कोरोनाच्या नव्या व्हायरसचा प्रादुर्भाव अत्यंत वेगाने होत आहे. त्यामुळे ब्रिटनमध्ये पुन्हा एकदा कडक लॉकडाऊन पाळण्यात येत आहे. अशातचं आता ब्रिटनहून भारतात परत आलेल्या प्रवाशांमध्ये सुमारे 20 प्रवाशांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. त्यामुळे देशात भीतीचे वातावरण पसरले आहे. सरकारने ब्रिटनहून येणाऱ्या लोकांसाठी कठोर गाईडलाईन्स जारी केल्या आहेत. यात प्रत्येक प्रवाशाला विमानतळावर RT-PCR चाचणी करणे अनिवार्य असल्याचे सांगण्यात आले आहे. दरम्यान, भारताने ब्रिटनहून येणाऱ्या सर्व विमानसेवा आजपासून 31 डिसेंबपर्यंत बंद ठेवल्या आहेत. पुढील काही दिवस विमानसेवा बंद असल्याने मंगळवारी ब्रिटनमधून भारतात अनेक प्रवासी दाखल झाले.
सरकारच्या नव्या गाईडलाईन्सनुसार, कोरोनाचा नव्या प्रकार रोखण्यासाठी ब्रिटनमधून येणाऱ्या प्रवाशांची RT-PCR चाचणी करणे अनिवार्य आहे. या चाचणीमध्ये आतापर्यंत 20 प्रवाशांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. मात्र, या प्रवाशांना नव्या कोरोना विषाणूचे संक्रमण झाले आहे की नाही? हे अद्याप समजू शकलेलं नाही. (हेही वाचा - New Coronavirus Strain: युकेमध्ये सापडलेल्या नवीन कोरोना व्हायरस स्ट्रेनचा भारताला धोका? जाणून घ्या काय म्हणाले आरोग्य मंत्रालय)
निती आयोगचे सदस्य डॉ. व्ही के पॉल यांनी सांगितलं की, ब्रिटनहून आलेल्या नव्या कोरोना विषाणूला घाबरण्याची गरज नाही. परंतु, तरी नागरिकांनी सतर्क राहणं आवश्यक आहे. भारतात आतापर्यंत याप्रकारचा कोणताही विषाणू आढळून आलेला नाही. या नव्या विषाणूमुळे कोरोना लशीच्या विकासावर कोणताही परिणाम होणार नाही. मात्र, या विषाणूचा प्रादुर्भाव अधिक वेगाने होतो. त्यामुळे योग्य खबरदारी घेण गरजेचं आहे.
नव्या कोरोना व्हायरससंदर्भात बोलताना एम्सचे संचालक गुलेरिया यांनी सांगितलं की, भारतात अद्याप नव्या प्रकाराच्या विषाणूचे संक्रमण झालेला रुग्ण आढळून आलेला नाही. परंतु, ब्रिटनहून येणाऱ्या प्रत्येक प्रवाशांची कोरोना चाचणी करून त्यांना विलगीकरण कक्षात ठेवणं अनिवार्य आहे. ब्रिटनहून येणाऱ्या प्रवाशांमध्ये नव्या प्रकाराच्या विषाणूचे जेनेटिक सीक्वेन्स तर नाही ना, हे तपासणं आवश्यक आहे. याशिवाय या विषाणूचा प्रादुर्भाव जलद गतीने होणार आहे. त्यामुळे समुह संक्रमण वाढण्याची शक्यता आहे.