New Coronavirus Strain: युकेमध्ये सापडलेल्या नवीन कोरोना व्हायरस स्ट्रेनचा भारताला धोका? जाणून घ्या काय म्हणाले आरोग्य मंत्रालय
Dr VK Paul (Photo Credits: ANI)

केंद्रीय आरोग्य मंत्रालय (Health Ministry) आणि आयसीएमआरने मंगळवारी देशातील कोविड-19 (Coronavirus) परिस्थितीबाबत पत्रकार परिषद घेतली. आरोग्य मंत्रालयाचे सचिव राजेश भूषण म्हणाले की, देशात सुमारे 5.5 महिन्यांनंतर कोरोनाचे तीन लाखाहूनही कमी सक्रिय रुग्ण आढळले आहेत. सध्या सक्रिय प्रकरणांची संख्या एकूण प्रकरणांपैकी केवळ तीन टक्के आहे. त्याच वेळी, कोरोनाचा रिकव्हरी रेट 95 टक्क्यांपेक्षा जास्त आहे. दुसरीकडे, युकेमध्ये सापडलेल्या कोरोना विषाणूच्या नवीन स्ट्रेनमुळे (New Coronavirus Strain) खळबळ उडाली आहे. मात्र या स्ट्रेनशी निगडीत एकही प्रकरण भारतामध्ये नोंदवले गेले नसल्याचे आरोग्य मंत्रालयाने सांगितले.

आरोग्य मंत्रालयाने मंगळवारी सांगितले की, ब्रिटनमध्ये पसरलेल्या कोरोना विषाणूच्या नवीन स्ट्रेनचा सध्याच्या आजाराच्या तीव्रतेवर परिणाम होत नाही किंवा मृत्यूच्या प्रमाणातही वाढ होत नाही. मंत्रालयाने म्हटले आहे की याबद्दल चिंता करण्याची गरज नाही, त्याऐवजी सर्वांनी सतर्क राहण्याची आवश्यकता आहे. आरोग्य मंत्रालयाच्या साप्ताहिक पत्रकार परिषदेत नीती आयोगाचे सदस्य डॉ. व्हीके पॉल म्हणाले की ब्रिटनमधील कोरोना विषाणूच्या नवीन स्ट्रेनशी निगडीत एकही रुग्ण भारतामध्ये सापडला नाही.

पॉल यांनी सांगितले की हा नवीन प्रकारचा विषाणू लोकांना वेगाने संक्रमित करणारा आहे. त्यांच्या मते, हा प्रकार लोकांना जास्त आजारी नाही पडणार मात्र जास्त लोकांना आजारी पाडू शकतो. कोरोना विषाणूच्या नवीन स्ट्रेनवर लसींच्या प्रभावाबाबत डॉ. व्हीके पॉल म्हणाले की, आपल्या देशात आतापर्यंत विकसित झालेल्या आणि इतर देशांमध्ये उपलब्ध असलेल्या कोरोना विषाणूच्या संभाव्य लसींचा या विषाणूचा परिणाम होत नाही. ब्रिटनमध्ये आढळलेला हा स्ट्रेन भारतामध्ये अजूनतरी पोहोचला नसल्याचे काळजीचे कारण नाही.

भारतामधील कोरोनाची स्थिती सुधारत असल्याचेही आरोग्य मंत्रालयाने सांगितले. आरोग्य सचिवांनी सांगितले की, गेल्या 24 तासात नोंदवलेल्या एकूण प्रकरणांपैकी 57 टक्के प्रकरणे मध्य प्रदेश, तामिळनाडू, छत्तीसगड, पश्चिम बंगाल, महाराष्ट्र आणि केरळमधून समोर आली आहेत. यूपी, छत्तीसगड, दिल्ली, केरळ, पश्चिम बंगाल आणि महाराष्ट्रात एकूण 61 टक्के मृत्यू झाले आहेत.