कोरोना विषाणू (Coronavirus) महामारीने अनेक घरे उध्वस्त केली आहेत. या संसर्गामुळे कित्येकांनी आपल्या प्रिय व्यक्तींना गमावले आहे. आता लोकप्रिय युट्यूबर भुवन बामने (Bhuvan Bam) कोरोनामुळे आपल्या दोन्ही पालकांनी गमावले आहे. भुवनने आपल्या सोशल मीडिया पोस्टच्या माध्यमातून याबाबत माहिती दिली आहे. भुवन बामने आपल्या आई-वडिलांना गमावल्याबद्दलचे दुःख व्यक्त करणारी भावूक नोट लिहिली आहे. 2020 च्या नोव्हेंबर महिन्यात भुवनलाही कोविड झाला होता. त्यावेळी तो त्याच्या घरीच होता. पण गेल्या काही वर्षांपासून त्याच्या वडिलांची तब्येत खूपच खराब होती, यामुळे त्यांच्यावर उपचार सुरू होते.
सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत भुवनने लिहिले आहे की, ‘कोविडमुळे मी माझी दोन्ही लाईफलाईन गमावल्या आहेत. आई आणि बाबांशिवाय काहीच पहिल्यासारखे होणार नाही. एका महिन्यात सर्व काही विखुरलेले आहे...घर, स्वप्ने. माझी आई माझ्यासोबत नाही, माझे बाबा माझ्यासोबत नाहीत. आता मला सुरुवातीपासूनच जगायला शिकावे लागेल, मात्र इच्छाच नाही.’
View this post on Instagram
भुवन पुढे म्हणतो, ‘मी एक चांगला मुलगा होतो का? मी त्यांना वाचवण्याचे सर्व प्रयत्न केले? आयुष्यभर हे प्रश्न मला छळत राहतील. कधी एकदा त्यांना भेटतोय असे झाले आहे, आशा आहे की तो दिवस लवकरच येईल.’ (हेही वाचा: Dilip Kumar यांना रुग्णालयातून डिस्चार्ज; पत्नी Saira Bano ने मानले चाहत्यांचे आभार)
यू ट्यूबर आणि स्टँडअप कॉमेडियन भुवन बाम गरजूंच्या मदतीसाठीही पुढे आला होता. मिळालेल्या माहितीनुसार भुवन बामने पीएम केअर फंडला 10 लाख रुपये देण्याची घोषणा केली होती. दरम्यान, गुजरातमधील बडोदा शहरात 22 जानेवारी 1994 रोजी जन्मलेल्या भुवनने 20 जून 2015 रोजी आपले यूट्यूब चॅनेल सुरू केले. अगदी कमी वेळात भुवनच्या कंटेंटमुळे तो स्टार झाला. BB Ki Vines द्वारे तो जगभरात लोकप्रिय आहे.