Crime Patrol फेम अभिनेत्री प्रेक्षा मेहता हिची वयाच्या 25 व्या वर्षी आत्महत्या; कामाच्या चिंतेमुळे तणावाखाली असल्याची कुटुंबाची माहिती
Crime Patrol Actress Preksha Mehta (Photo Credits: Insta)

टीव्ही अभिनेत्री प्रेक्षा मेहता  (Preksha Mehta) हिने सोमवारी रात्री उशिरा इंदूरच्या बजरंग नगर येथील आपल्या राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या (Suicide) केली. प्रेक्षा मुंबईत राहत होती व लॉकडाउन सुरू होण्यापूर्वी ती आपल्या घरी परतली होती. 25 वर्षांच्या प्रेक्षाने क्राइम पेट्रोलच्या (Crime Patrol) अनेक एपिसोडसह इतरही अनेक मालिकांमध्ये काम केले आहे. सध्या कोरोना व्हायरस लॉक डाऊनमुळे काम बंद पडल्यामुळे प्रेक्षा मानसिक तणावाखाली वावरत होती, असे तिच्या कुटुंबाचे म्हणणे आहे. आत्महत्येपूर्वी प्रेक्षाने सोशल मीडियावर एक स्टेटस अपडेट केला होता, त्यात तिने लिहिले आहे- ‘सर्वात वाईट गोष्ट म्हणजे तुमच्या स्वप्नांचा होणारा मृत्यू’.

गेल्या काही दिवसांपासून प्रेक्षा अतिशय निराश होती. सोमवारी रात्री ती तिच्या खोलीत गेली तेव्हा तीने थोडावेळ मोबाईलचा वापर केला. रात्री उशिरा तिने मोबाईलवरून एक निराशाजनक स्टेटस सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर अपलोड केले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी जेव्हा तिचे वडील तिला उठविण्यासाठी खोलीत गेले असता, त्यांना प्रेक्षाचा मृतदेह लटकलेला आढळला. कुटुंबीयांनी तिला तातडीने रुग्णालयात दाखल केले व तिथे प्रेक्षला मृत घोषित करण्यात आले. (हेही वाचा: बॉलिवूड चित्रपट निर्माते करण जौहर यांच्या घरात कोरोनाचा शिरकाव; संपूर्ण कुटूंब क्वारंटाईन)

प्रेक्षाने सुसाइड नोट लिहिली आहे परंतु त्यामध्ये आत्महत्येचे कारण लिहिले नाही. हिरा नगर पोलिस स्टेशनचे प्रभारी राजीव भदोरिया यांनी याबाबत माहिती दिली. तिच्या आत्महत्येचे कारण जाणून घेण्यासाठी आम्ही या प्रकरणाचा अधिक तपास करीत आहोत, असेही ते म्हणाले. लॉकडाऊनमुळे सध्या असे अनेक कलाकार व तंत्रज्ञ आहेत ज्यांना सध्या कामाची चिंता सतावत आहे. याआधी मागच्या आठवड्यात अभिनेता मनमीत ग्रेवालने आत्महत्या केली होती.