आजच्या भागाची सुरुवात ‘यादें’ या गाण्याने होते. सदस्यांचे बिग बॉसच्या घरातील अवघे काही दिवसच शिल्लक राहिले आहेत, त्यात हे गाणे वाजल्याने सर्वजण इमोशनल होतात. त्यानंतर सदस्यांचा बिग बॉसच्या घरातील प्रवास दाखवण्यास सुरुवात होते. यासाठी पहिल्यांना शिवला गार्डन एरियामध्ये बोलावले जाते. बिग बॉस त्याची तारीफ करत, त्याचे घरातील काही फोटो दाखवतात. इथे आतापर्यंतची शिवची कामगिरी, त्याचे घरातील उतार चढाव, इतर सदस्यांच्या सोबतचे त्याचे नाते, त्याची खेळी एकंदर त्याचा आतापर्यंतचा प्रवास कथन केला जातो. हे सर्व ऐकून शिव थोडा भावनिक होतो. त्यानंतर शिवबाबतची एक AV दाखवली जाते. शेवटी आतिषबाजी करून शिवला घरात पाठवले जाते.
घरात गेल्यावर आलेला अनुभव शिव इतर सदस्यांसोबत शेअर करतो. त्यानंतर किशोरी शहाणे यांची तारीफ सुरु होते. किशोरी यांचा प्रवास हा फार अनेपक्षित राहिला आहे. त्या खूप वेळा बाहेर जाण्याच्या मार्गावर असताना पुन्हा-पुन्हा चाहत्यांनी त्यांना सेफ केले. यामुळेच किशोरी यांच्या स्वभावाचे विविध पैलू आपल्याला दिसू शकले. अशा प्रकारे किशोरी यांच्याकडून घडलेल्या चांगल्या गोष्टी, चुका, इतरांसोबतचे त्यांचे नातेसंबंध, त्यांनी घेतलेली किचनची जबाबदारी, किशोरी यांच्यावर झालेले आरोप, टीका, त्यानंतर त्यांचा परत आलेला आत्मविश्वास अशा सर्व गोष्टी कथन केल्या जातात. शेवटी त्यांच्याही प्रवासाचा एक व्हिडीओ दाखवून आतिषबाजी केली जाते. (हेही वाचा: बिग बॉसच्या घरात रंगली पत्रकार परिषद, शिव-वीणाच्या लग्नाची घोषणा, शिवानी-नेहाची मैत्री ठरला चर्चेचा विषय)
त्यानंतर सुरु होतो तो नेहाचा प्रवास. नेहा सुरुवातीपासूनच बिग बॉसच्या घरातील एक तगडी स्पर्धक मानली जात आहे. त्यात तिच्या अग्रेसिव्ह स्वभावामुळे तिने घरात स्वतःचे स्थान निर्माण केले आहे. या दरम्यान तिचे अनेक पैलू आपल्याला दिसले. वेळोवेळी तिच्यामधील कवयित्री समोर आली, हळूहळू तिचे आणि शिवानीचे नाते घट्ट होऊ लागले. त्यानंतर परागसोबत एक न विसरता येणारी घटना घडली, या दरम्यान तिच्यावर अनेकडा टीकाही झाल्या मात्र त्याला तिने प्रत्युत्तर दिले. अशा अनेक गोष्टी बिग बॉस कथन करतात. त्यानंतर तिच्याही प्रवासाचा एक व्हिडीओ दाखवला जातो.
एकंदरच आजच्या भागात घरातील सदस्यांबद्दल अनेक चांगल्या गोष्टी ऐकायला आणि पाहायला मिळाल्या. याचा व्होटिंगवर किती परिणाम होईल ते लवकरच कळेल.