बिग बॉसच्या कालच्या टास्कचा पोरखेळ केल्यानंतर वीणा आणि रुपाली कप्तानपदाच्या उमेदवार ठरल्या आहेत. आजच्या भागाची सुरुवात अभिजितच्या माफी मागण्याने होते. अभिजितने माईक चुकीच्या पद्धतीने घातल्याने स्वतःला शिक्षा म्हणून तो अडगळीच्या खोलीत डांबून घेतो, व शिधा पूर्ववत सुरु करा अशी विनंती करून माफी मागतो. त्यानंतर अशाप्रकारे वैयक्तिक कारणाकरिता अभिजित अडगळीच्या खोलीत बसल्याने त्याला बिग बॉस पुन्हा त्या खोलीत पाठवतात. आता पुढचा आदेश येईपर्यंत त्याला तिथेच बसायचे आहे.
त्यानंतर घरात शिवानी सुर्वेची एन्ट्री होते. बिग बॉस चार स्तुती सुमने उधळून तिला घरात प्रवेश करण्याची परवानगी देतात. मात्र शिवानी पुढच्या आदेशापर्यंत घरात पाहुणी म्हणून राहील असे तिला सांगण्यात येते. त्यानंतर सर्वांची नावे घेत, सर्वांना आश्चर्याचा धक्का देत शिवानी घरात येते. ती सर्वांना भेटत असताना वीणाच्या चेहऱ्याचा रंग पूर्णपणे उडाल्याचे दिसते. इकडे परत रुपाली आणि किशोरी यांच्यातील वाद उफाळून येतो. रुपाली आपल्याशी व्यवस्थित बोलत नाही हे किशोरी तिला सानागत असते, त्यावर रुपाली चिडते. त्यानंतर पुन्हा एकदा ही चर्चा एकमेकींवर आरोप करत भांडणात रुपांतरीत होते.
आता हीना किशोरीच्या अतिशय जवळ आली आहे. किशोरीही आपल्या मनातील दुःख तिच्यापुढे व्यक्त करते. रात्री शिवानी, माधव, नेहा आता पुढे कसे खेळायचे याचा विचार करतात. मुख्यत्वे वीणा आणि शिव यांच्याशी कसे डील करायचे याबद्दल चर्चा होते. (हेही वाचा: पुढच्या आठवड्यातील कप्तानपदासाठी वीणा आणि रुपाली मध्ये होणार लढत)
अखेर घरात महेश मांजरेकारांची एन्ट्री होते. गेल्या आठवड्यात अनेक गोष्टी घडलेल्या आहेत त्याबद्दल शाळा घेणे सुरु होते. वीणा आणि शिवला सर्वात वाईट खेळाडू ठरवून ते वीणा आणि रुपालीची कानउघडणी करतात. रुपाली आणि वीणा ज्या प्रकारे किशोरीशी बोलत आहेत त्याबद्दल त्यांना सुनावले जाते. इथे किशोरीला तू जशी आहेस तशीच राहा, त्यांच्यापुढे झुकू नको असा सल्ला देतात. त्यानंतर वैशालीने फोनवर ज्या प्रकारे रुपालीच्या वैयक्तिक आयुष्यावर हल्ला केला त्याबद्दल तिला समज दिली जाते. पुढे वीणा आणि शिव यांची जवळीक आणि त्यामुळे शिव कसा बदलला आहे हा मुद्दाही चर्चेत येतो.
अखेर सुरु होते या आठवड्यातील सर्वात गाजलेले भाकरी प्रकरण. हे प्रकरण सोशल मिडीयावरदेखील गाजले होते. इथे वीणा पूर्णतः चुकीची होती, तिने मुद्दाम या प्रकरणात आग लावली होती याबद्दल तिला झाडले जाते. त्यानंतर अभिजित ज्या प्रकारे या संपूर्ण प्रकरणात वागला, ज्याप्रकारे त्याने हीनाला सर्वांसमोर भिक मागायला भाग पाडले त्याबद्दल त्याला खडे बोल सुनावले जातात. या संपूर्ण प्रकरणात घरातील सर्व सदस्यही कसे चुकीचे वागले याबद्दल सगळ्यांनाच त्यांची चूक दाखवून दिली जाते. मात्र इथे या सदस्यांना इतके समजावूनही मुद्दा समजत नाही. गोष्ट फक्त एका भाकरीची होती मात्र त्याचेही मोठे पुराण घडते.