बिग बॉस (Bigg Boss Marathi) च्या घरात कालच्या भागात ‘एक डाव भुताचा’ या साप्ताहिक कार्याला सुरुवात झाली आहे. काल पहिल्या फेरीत वैशाली एकटी मागे राहते. आज पुन्हा एकदा दुसऱ्या फेरीच्या माध्यमातून या टास्कला सुरुवात होते. कालच्याप्रमाणे पुन्हा एकदा खेळ खेळण्याऐवजी सर्व सदस्य एकमेकांशी डील करायला सुरुवात करतात. पहिल्या फेरीत वैशाली नंतर आज दुसऱ्या फेरीत अभिजित बाद होतो. शेवटी डीलच्या माध्यमातून घरात चाललेल्या पोरखेळाचा बिग बॉसही निषेध करतात, व त्याबद्दल सदस्यांची कानउघडणी करतात.
शेवटच्या आणि तिसऱ्या फेरीत शिव मुद्दाम वीणाला जिंकू देतो, अशाप्रकारे वीणा कप्तानपदाच्या शर्यतीसाठी पात्र ठरते. त्यानंतर टीम B मधील लोक टीम Aच्या सदस्यांच्या बाहुल्या कुठे ठेवायच्या याबद्दल चर्चा करतात. इथे त्यांना रुपालीला जिंकवायचे असल्याने ते तिची बाहुली सहज सापडेल अशा ठिकाणी ठेवूया असा विचार करतात. (हेही वाचा: बिग बॉसचे टास्क फक्त नावापुरतेच, खेळण्याऐवजी सदस्य करत आहेत Match Fixing)
खेळाचा बझर वाजल्यावर टीम B मधील लोक बाहुल्या लपवायला सुरुवात करतात. पहिल्या फेरीत नेहाची बाहुली उंचावर लपवून ठेवल्याने तिला ती काढणे शक्य ठरत नाही. त्यामुळे रुपाली, माधव आणि हीना पहिली फेरी जिंकतात. दुसऱ्या फेरीत माधव आणि नेहा बाद होतात. शेवटी तिसऱ्या फेरीत मुद्दाम हीनाची बाहुली अवघड जागी लपवून ठेवल्याने फक्त रुपाली जिंकते. अशाप्रकारे वीणा आणि रुपाली पुढील आठवड्यासाठी कप्तानपदाचे उमेदवार ठरतात.