
लवकरच तुम्हाला बिग बॉस 15 (Bigg Boss 15) च्या घरात असे काही पाहायला मिळणार आहे, जे तुम्ही यापूर्वी कधीही पाहिले नसेल. होय, बिग बॉसची माजी स्पर्धक राखी सावंत (Rakhi Sawant) पुन्हा एकदा या घरात एन्ट्री मारणार आहे. पण तिच्या एन्ट्रीतील सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे राखी पती रितेशसोबत या शोमध्ये प्रवेश करणार आहे. गेल्या सीझनमध्ये राखीचा पती रितेशबद्दल खूप चर्चा झाली होती. रितेश या शोमध्ये येणार असल्याची बातमीही आली होती, पण तसे झाले नाही. मात्र आता बिग बॉसच्या निमित्ताने संपूर्ण जग राखी सावंतचा नवरा पहिल्यांदाच पाहू शकणार आहे. या नव्या हंगामामध्ये राखीची पाचवी वाईल्ड कार्ड एंट्री असेल.
नुकतेच घरात तीन वाईल्ड कार्ड एंट्री झाल्या आहेत. त्या म्हणजे रश्मी देसाई, देवोलिना भट्टाचार्जी आणि अभिजित बिचुकले. तिघेही बिग बॉसचे माजी स्पर्धक आहेत. अभिजित बिचुकले बिग बॉस मराठीमध्ये दिसले होते, तर रश्मी आणि देवोलिना बिग बॉसच्या सर्वात सुपरहिट सीझन 13 मध्ये दिसल्या आहेत. या तिघांच्या आधी राजीव अदातियाही वाईल्ड कार्ड म्हणून घरात आला आहे.
राखी सावंतच्या पतीबद्दल अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. लग्नानंतर राखीच्या पतीला कोणीही पाहिले नाही. राखीचे लग्न हा पब्लिसिटी स्टंट तर नाही ना, असा सवालही अनेकांनी उपस्थित केला आहे. राखी सावंतने न्यूज18 डिजिटलशी खास बातचीत करताना सांगितले की, आता बिग बॉसच्या घरात तिची आणि तिच्या पतीची केमिस्ट्री पाहून लोक दंग होतील. गेल्या सिझनमध्ये रितेशकडे वेळ नव्हता परंतु आता तो आपल्यासोबत घरात प्रवेश करणार असल्याचे राखीने सांगितले आहे. (हेही वाचा: लवकरच Aamir Khan अडकणार तिसऱ्या विवाहबंधनात? आपल्या को-स्टारसोबतच्या लग्नाच्या चर्चांना उधाण, जाणून घ्या सविस्तर)
राखी सावंतच्या म्हणण्यानुसार, तिचा नवरा एनआरआय बिझनेसमन आहे आणि त्याला मीडियासमोर येणे आवडत नाही. रितेश आजपर्यंत मीडियासमोर आलेला नाही. पण आता कलर्सच्या या शोमध्ये राखीच्या पतीचा चेहरा जगाला पहिल्यांदाच पाहायला मिळणार आहे.