बिग बॉस सीझन 13 (Bigg Boss 13) मुळे जबरदस्त लोकप्रियता मिळवणारा मॉडेल असीम रियाज (Asim Riaz) याच्या बाबत एक धक्कादायक घटना घडली आहे. असीमवर काही अज्ञात लोकांनी हल्ला केला आहे. यामुळे त्याला बरीच दुखापत झाली आहे. असीमने आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीजमध्ये काही व्हिडिओ अपलोड केले आहेत. या व्हिडिओमध्ये असीमने घडलेल्या घटनेबाबत माहिती दिली आहे, तसेच त्याच्या गुडघ्याला, खांद्याला व पायाला जखम झाल्याचेही दिसत आहे. असीम सायकलिंगला गेला असता ही गोष्ट घडली आहे. मात्र यामागे नेमका काय हेतू होता हे समजले नाही.
याबाबत माहिती देताना असीम म्हणतो, ‘मी आता सायकल चालवत होतो, इतक्यात मागून बाईक आली आणि माझ्यावर हल्ला झाला. महत्वाचे म्हणजे हा हल्ला माझ्यावर समोरून नाही तर मागून झाला.’ त्यानंतर असीमने या हल्ल्यामध्ये त्याला झालेली दुखापत दाखवली आहे. असीमचा खांदा, पाय, गुडघा यांना प्रचंड दुखापत झालेली दिसून येत आहे तसेच त्याच्या शरीरावर रक्ताचे डागही दिसत आहेत. या अपघाताविषयी बोलताना असीम म्हणाला, ‘सर्व काही ठीक आहे. मी अद्याप हार मानलेली नाही.’ मात्र आतापर्यंत असीमच्या हल्लेखोरांविषयी कोणतीही माहिती मिळालेली नाही. (हेही वाचा: टीव्ही अभिनेता Sameer Sharma चे निधन, मुंबईतील राहत्या घरात आढळला मृतदेह, आत्महत्या केल्याचा संशय)
पहा व्हिडिओ -
असीम रियाज जखमी झाल्याची बातमी समजताच तो सोशल मीडियावर ट्रेंड व्हायला सुरुवात झाली. त्यानंतर असीमच्या हजारो चाहत्यांनी त्याच्यासाठी प्रार्थना करण्यास सुरवात केली. असे बरेच चाहते होते ज्यांनी या घटनेबद्दल तीव्र निषेध नोंदवला व असीम लवकरच बरा होवो अशा शुभेच्छा दिल्या. याप्रकरणी असीमने पोलिसांत तक्रार दाखल करावी आणि दोषींवर कठोर कारवाई केली जावी, असेही काही चाहते म्हणाले. तर सोशल मीडियावरील काही लोकांनी असीमवरील हल्ल्याला पब्लिसिटी स्टंट म्हटले आहे.