Thackeray Movie Review:  धारधार संवाद, लाजवाब अभिनय आणि राजकारणाच्या पटाबाहेरील अनेक गोष्टी समजून घेण्यासाठी 'ठाकरे' पाहाच!
ठाकरे चित्रपट रिव्यू (File Image)

Thackeray Movie Review: शिवसेनचे संस्थापक बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांचा जीवनपट रुपेरी पडद्यावर घेऊन येण्याचे शिवधनुष्य संजय राऊत आणि अभिजित पानसे यांची उचलले. आज ते यथाशक्ती पेलले गेल्याचा प्रत्यय ‘ठाकरे’ (Thackeray) हा चित्रपट पाहताना येतो. गेले कित्येक आठवडे प्रमोशन चाललेला हा चित्रपट आज (25 जानेवारी) मराठी आणि हिंदी भाषेत प्रदर्शित झाला. महाराष्ट्रात बाळासाहेब ठाकरे हे फक्त एक नाव नसून ती भावना आहे. आज तमाम मराठी लोकांना ही भावना कशाप्रकारे जागरूक ठेवते, कशा प्रकारे लढण्याचे बळ देते हे समजून घ्यायचे असेल हा चित्रपट नक्की पाहावा. चित्रपट प्रदर्शनाच्या उंबरठ्यावर असताना बाळासाहेबांसाठी सचिन खेडेकर यांनी दिलेला आवाज बदलण्यात आला, आणी आत हाच आवाज चित्रपटाचा युएसपी ठरला आहे. संपूर्ण चित्रपट हा आवाज भारून टाकतो. अजून विशेष नमूद करावी अशी गोष्ट म्हणजे नवाजुद्दीन सिद्दिकी याचा अभिनय. चित्रपटात नक्कीच काहीच त्रुटी राहून गेल्या आहेत मात्र पडद्यावर बाळासाहेबांच्या व्यक्तीमत्वाखाली त्या झाकोळल्या गेल्या आहेत.

चित्रपटाचा फर्स्ट हाफ हा अतिशय घाई केल्यासारखा वाटतो. एका सामान्य माणूस ते इतक्या मोठ्या पक्षाचा संस्थापक हा प्रवास फर्स्ट हाफमध्ये दाखविण्यात आला आहे. मात्र हे सिन्स इतके पटापट घडतात की, काय चालले आहे हे समजून घ्यायला वेळच मिळत नाही. चित्रपटाच्या सेकंड हाफने चांगलीच पकड घेतली आहे. बाळासाहेब ज्या ज्या मुद्द्यांवर लढते ते जवळजवळ सर्व मुडे एक एक सीनद्वारे कव्हर करण्यात आले आहेत. फर्स्ट हाफसाठी ब्लॅक अँड व्हाईट टोन वापरण्यात आला आहे. तो फारच प्रभावी वाटतो. मनोहर जोशी यांच्या शपतविधीजवळ चित्रपट संपतो मात्र त्यानंतर चित्रपटाचा पुढचा भाग येणार असल्याची घोषणा केली जाते. त्यामुळे ठाकरेचा पहिला भाग पाहिल्यावर आता उत्सुकता आहे ती दुसऱ्या भागाची.

कथा  - चित्रपटात एक सलग अशी कथा नाही. पक्षस्थापना कशी झाली इथपासून ते मनोहर जोशी यांचा शपतविधीपर्यंतच्या गोष्टी ज्या ज्या वेळी, ज्या ज्या प्रकारे घडल्या त्या घटनांच्या रुपात मांडण्यात आल्या आहेत.

70 चे दशक जिथे प्रबोधनकार ठाकरे यांचा मुलगा, एक नोकरी करणारा तरुण म्हणून बाळ ठाकरे सर्वसामान्य व्यक्तीप्रमाणे जीवन जगत असतात. मात्र महाराष्ट्राच्याच भूमीत मराठी लोकांचा होत असलेला अपमान, परप्रांतीयांकडून मराठी भाषेची होत असलेली गळचेपी, बाहेरील लोकांनी इथे येऊन व्यापून टाकलेला बाजार हे पाहून बाळासाहेबांचे रक्त खवळत असते. शेवटी एक दिवस ते नोकरी सोडून, व्यंगचित्रांचे साप्ताहित ‘मार्मिक’ सुरु करतात. या साप्तीहीकाद्वारे सरकारवर, समाजव्यवस्थेवर फटकारे मारू लागतात. मात्र लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी इतकेच करून भागणार नाही हे समजल्यावर जन्म होतो तो ‘शिवसेने’चा. हळू हळू शिवसेनेची लोकप्रियता वाढू लागते. पहिल्या दसरा मेळाव्याच्या भाषणानंतर तर तळागाळातील लोक शिवसेना पाठींबा देऊ लागतात. त्यांनतर हळू हळू बेळगाव –कारवार मुद्दा, मोरारजी देसाई यांचा मुंबई दौरा, कृष्णा देसाई हल्ला या गोष्टींमधून शिवसेनेचे महत्व प्रस्थापित होऊ लागते.

सेकंद हाफमध्ये बाळासाहेबांनी केलेले कार्य दाखवण्यात आले आहे. यामध्ये मराठी माणसाच्या नोकरीला, शिक्षणाचा मुद्दा. इंदिरा गांधी भेट, बाबरी मशीद मुद्दा, 1993 चा बॉम्बस्फोट, दिलीप वेंगसळकर भेट, शरद पवार भेट, महाराष्ट्र दौरा आणि त्यानंतर शेवटी शिवसेनेच्या मनोहर जोशी यांनी घेतलेली मुख्यमंत्रीपदाची शपथ दाखवण्यात आले आहेत. चित्रपटामध्ये अतिशय महत्वाच्या मोजक्याच घटनांना स्थान देण्यात आले आहे.

पटकथा – बाळासाहेबांवर कोर्टात खटला चालू असतो, वकिलाच्या प्रश्नांना ते उत्तरे देत असतात आणि या उत्तरातूनच भूतकाळातील चित्र उभे राहते. बाळासाहेबांचे जीवन हीच चित्रपटाची कथा आहे, त्यामुळे त्यात बदल करण्यासारखे काही नाही. त्यामुळे सर्व भार पटकथेवर येतो. मात्र चित्रपटाच्या फर्स्ट हाफची पटकथा थोडी फसल्यासारखे वाटते. दोन सीनमधील कनेक्शन समजून घेण्यास थोडी अडचण येते. कथा अतिशय वेगाने पुढे जाते त्यामुळे त्या घटनांचे महत्व थोडेसे कमी झाल्यासारखे वाटते. उदा- मार्मिकनंतर  लगेच शिवसेनेची पक्षस्थापना. सेकंड हाफ अतिशय उत्तम लिहिला आहे. ज्या वेगाने शिवसेनेची दौड होत असते तो वेगही चित्रपटात पाहायला मिळतो. अधेमध्ये त्यांचे संसारिक सीन्स दाखवण्यात आले आहेत. यावरून त्यांना आपल्या कुटुंबाचीही काळजी आहे हे प्रतीत होते.

चित्रपटातील संवादही अतिशय प्रभावी आहेत. अगदी टाळ्या पडणार नाहीत असे असले तरी मराठी माणसांची मने ती नक्कीच जिंकू शकतील.

दिग्दर्शन – अभिजित पानसे या कसलेल्या दिग्दर्शकाने हा चित्रपट दिग्दर्शित केला आहे. ठराविक साच्यातील कॅमेरा अँगलला फाटा देऊन, प्रत्येक सीनचे महत्व जाणून त्यानुसार कॅमेरा फिरतो. यामुळेच हे सर्व सिन्स अगदी आपल्या डोळ्यासमोर घडत आहेत असा भास होतो. चित्रपटाच्या कला दिग्दर्शनाने या चित्रपटांच्या शॉट्समध्ये जान आणली आहे. त्यावेळचा काळ उभा करण्यात कोणतीही कसर ठेवली नाही. चित्रपटातील काही सिन्स तर अतिशय उत्तमरित्या चित्रित करण्यात आले आहेत. मोरारजी देसाई यांचा मुंबई दौरा आणि त्यावेळी घडलेली हिंसा हा सीन तर अंगावर काटा आणणारा आहे. फक्त हाच नाही तर दंगलींचे इतरही सीन्स अतिशय चांगले शूट झाले आहेत. सेकंड हाफमध्ये शिवसेना महाराष्ट्रात पाय रोवत असते हे दाखवण्यासाठी अतिशय चांगला मोंटाज वापरला आहे. तसेच बाबरी मशीद मुद्दा, मुंबई बॉम्बस्फोट आणि त्यानंतर बाळासाहेबांचा महाराष्ट्र दौरा  हे तीनही सिन्स अतिशय कमी शॉट्स दाखवण्यात आले आहेत. मात्र तरी ते प्रभावी वाटतात.

अभिनय - नवाजुद्दीन सिद्दिकीच्या अभिनयाने या चित्रपटाला चार चांद लागले आहेत. बाळासाहेबांची बोली, त्यांचा करारीपणा, चेहऱ्यावरील भाव, काही सवयी (उदा-वेळोवेळी चष्म्याची काडी वर करणे) अगदी हुबेहूब वठवण्यात आल्या आहेत. उंची कमी असली तरी त्या व्यक्तिमत्वाचा भारदस्तपण प्रत्येक सीनमध्ये जाणवतो. अमृता राव हिने त्यांची पत्नी मीनाताई ठाकरे यांची भूमिका साकारली आहे. तिचे मात्र मराठी संवाद काही जमून आल्यासारखे वाटत नाही. बाकी तिने एका गृहिणीची भूमिका उत्तम निभावली आहे.

संगीत – चित्रपटाच्या पहिल्या भागात कोणतेही गाणे नाही मात्र बॅकग्राऊंड स्कोर चित्रपटाची उंची वाढवतो. बाळासाहेबांची एन्ट्री आणि घडलेल्या प्रत्येक विजयानंतर जे संगीत मागे वाजते त्यामुळे अभिमानाने उर भरून येतो.

जमेच्या बाजू

> नवाजुद्दीन सिद्दिकीचा अभिनय

> कला दिग्दर्शन

> बाळासाहेबांची भाषणे आणि संवाद

> दंगे आणि आंदोलनाच्या सीन्सचे दिगदर्शन

कुठे कमी पडतो ?

चित्रपटाचा फर्स्ट हाफ अजून चांगला होऊ शकला असता. पटकथेत चित्रपट थोडा कमी पडतो.

किती स्टार्स – आताच्या पिढीने बाळासाहेबांना पहिले नाही, मात्र त्यांनी ज्या भावनेने शिवसेनेचे कार्य सुरु केले, ते ज्या महत्वाच्या मुद्द्यांवर लढले, बदलत्या परिस्थितीनुसार त्यावेळी निर्णय कसे घेतले गेले हे पाहण्यासाठी हा चित्रपट जरूर पाहावा. यात नवाजुद्दीन सिद्दिकीचा अभिनय ही फार मोठी ट्रीट असणार आहे. आम्ही या चित्रपटाला देत आहोत साडेतीन स्टार. आता याचा पुढील भाग काय कमाल दाखवतो ते पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

Rating:
3.5 out of 5