लवकरच बंद होणार सुनील ग्रोवरचा Kanpur Wale Khuranas; सलमान खान आहे कारण !
सुनील ग्रोवर (Photo Credits: Facebook, Show's Official Poster)

कपिल शर्माने (Kapil Sharma) आणि सुनील ग्रोवर (Sunil Grover), छोट्या पडद्यावरील अवलिये. या दोघांनी मिळून विनोदाचा चेहराच बदलला. रातोरात हे दोघेही प्रसिद्धीच्या शिखरावर पोहचले. मात्र कपिलने सुनीलशी घेतलेल्या फारकतीमुळे कपिलच्या कारकिर्दीला उतरली कळा लागायला सुरुवात झाली. शेवटी कपिलला आपला शो बंद करावा लागला. मात्र दुसरीकडे सुनीलची कारकीर्द उभारत होती. कपिलच्या नाकावर टिच्चून स्टार प्लस सारख्या वाहिनीवर सुनीलचा ‘कानपूरवाले खुराणाज्’ (Kanpur Wale Khuranas) हा शो सुरु झाला. अल्पावधीच हा शो लोकप्रियदेखील झाला. मात्र आता या शोच्या चाहत्यांसाठी एक वाईट बातमी आहे. लवकरच सुनीलचा हा शो बंद होणार आहे. ही बातमी स्वतः सुनीलने दिली आहे.

अपेक्षित टीआरपी मिळत असूनही सुनीलचा हा शो बंद होणार आहे, याला कारण आहे सलमान खानचा महत्वाकांक्षी चित्रपट ‘भारत’. सुनीलने हा शो फक्त आठ आठवड्यांसाठीच साईन केला होता. हा शो घेण्याआधीच सुनीलने भारत या चित्रपटाला त्याच्या पुढच्या तारखा दिल्या होत्या. मधल्या काळात काही वेळ शिल्लक असल्याने सुनीलने हा शो करायचे ठरवले होते. (हेही वाचा : कॉमेडीच्या बादशहाचे पुनरागमन; सोनीने प्रदर्शित केला कपिलच्या नव्या शोचा टीजर)

13 डिसेंबर रोजी ‘कानपूरवाले खुराणाज्’ हा शो सुरु झाला. सुनीलसोबत अली असगर, सुगंधा मिश्रा, उपासना सिंह अशा कलाकारांची तगडी टीम असल्याने प्रेक्षकांनीदेखील हा शो डोक्यावर घेतला. सुनील भारत या चित्रपटात फार महत्वाची भूमिका साकारात आहे. लवकरच भारतचे शुटींग सुरु होणार असल्याने, सुनीलला हा शो बंद करावा लागला. सलमान, सुनील यांसोबतच कॅटरिना कैफ, दिशा पटानी, तब्बू, जॅकी श्रॉफ असे कलाकार भारतमध्ये झळकणार आहेत.