The Kapil Sharma Show Teaser : कॉमेडीच्या बादशहाचे पुनरागमन; सोनीने प्रदर्शित केला कपिलच्या नव्या शोचा टीजर
कपिल शर्मा (Photo Credit: Hindustan Times)

The Kapil Sharma Show Teaser:  गेले कित्येक दिवस प्रेक्षक ज्या शोची आतुरतेने वात पाहत होते, तो ‘द कपिल शर्मा शो’ आता पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकताच सोनी वाहिनीने या शोचा टीजर प्रदर्शित केला आहे. त्यामुळे आता सोनी आणि कपिल यांच्यामधील सर्व वाद मिटले असून पुन्हा एकदा कपिल पोट धरून हसवायला सज्ज झाला आहे.

कपिलच्या या शोचा प्रोमो हा इतर प्रोमोंपेक्षा फार हटके आहे. या प्रोमोने लोकांच्या अगदी भावनांना हात घातला आहे. समाजातील तळागाळातील लोकांना भेदभाव विसरून एकत्र हसवण्याचे काम हा शो करत होता. स्वतःचे दुःख, तणाव विसरून संपूर्ण कुटुंब या शोचा एकत्र आस्वाद घेत असे.  त्यामुळे हा शो बंद झाल्यानंतर अनेकांना धक्का बसला होता. मात्र आता परत एकदा नव्या इनिंगसह कपिल छोट्या पडद्यावर पुनरागमन करत आहे.

याआधी ‘कॉमेडी नाइट विथ कपिल’ आणि ‘द कपिल शर्मा शो’ हे कपिलचे दोन शो छोट्या पडद्यावर खूपच गाजले. या शोने टीआरपीचे अनेक रेकॉर्ड मोडले. याच शोमुळे विनोदवीर कपिल शर्मा बॉलिवूडच्या सेलिब्रिटींपेक्षाही सर्वाधिक मानधन घेणारा स्टार ठरला. मात्र सहकलाकरांसोबत झालेल्या वादामुळे कपिलचा शो बंद पडला. त्यानंतर त्याने एप्रिल महिन्यात नवा शो सुरू केला. पण यावेळी कपिलचे वागणे, त्याची घमंड, अनप्रोफेशनलपणा या कारणांनी पहिल्याच भागानंतर तो शोदेखील बंद पडला. आता परत एकदा सोनीच्या साथीने कपिल तिसऱ्यांदा एक नवा शो घेऊन येत आहे.