Nilu Phule Death Anniversary: 'बाई वाड्यावर या' म्हणत आपल्या रांगड्या आवाजाने तब्बल 40 वर्ष प्रेक्षकांच्या मनावर आधिराज्य गाजवणारा पडद्यावरचा जबरदस्त खलनायक निळू फुले यांचा आज, दहावा स्मृती दिन आहे. मराठी चित्रपट सृष्टीत जेव्हा पौराणिक व कौटुंबिक कथांचा काळ सुरु होता, तेव्हा फुले यांनी खलनायकी रूपात सिनेमाला तडका लावला.'एक गाव बारा भानगडी' या सिनेमातून त्यांनी सिनेसृष्टीत पदार्पण केले, आणि त्यानंतर मागे वळून न पाहता, 2009 पर्यंत त्यांनी मायबाप प्रेक्षकांची सेवा केली, 13 जुलै 2009 रोजी त्यांनी वयाच्या 79 व्या वर्षी शेवटचा श्वास घेतला.
असं म्हणतात, एखाद्या नटाला टाळ्या, शिट्ट्या, मिळवून जेवढं कौतुक मिळालं नसेल तेवढे लोक पडद्यावरील या जादूगाराला शिव्या शाप द्यायचे, बायका तर अक्षरशः बोटं मोडायच्या , पण हीच निळू फुले यांच्या दमदार अभिनयाची पोचपावती होती. आज, निळू फुले यांच्या स्मृती दिनाच्या प्रित्यर्थ या रंगेल खलनायकाच्या पडद्यावरील व पडद्यामागील जीवनावर एक नजर टाकुयात..
अभिनयाकडे वळण्याआधी..
प्रेक्षकांची मने जिंकणाऱ्या निळू भाऊंचे खरे नाव निळकंठ कृष्णाजी फुले. पण निळूभाऊ याच नावाने ते चित्रपटसृष्टीतही लोकप्रिय झाले. समाजसुधारक ज्योतिराव फुले यांचं कुटुंबाचे ते वंशज होते, मात्र ही बाब फार जणांना ज्ञात नाही. निळूभाऊंचे वडील हे भाजी आणि लोखंडाचा व्यवसाय करून घर चालवायचे. अशा परिस्थितीत त्यांनी कसेबसे मॅट्रीक पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर त्यांनी एका ठिकाणी माळीकाम केले. यात त्यांना मानसिक समाधान मिळत होतं. मात्र काहीतरी व्यवसाय करायची त्यांची इच्छा होती. परंतु आर्थिक अडचणींमुळे ही इच्छा पूर्ण होऊ शकली नाही. सुरुवातीपासूनच अभिनयाची आवड असल्याने पुढे ते याच क्षेत्राकडे वळले.
रंगभूमीवरून जपली अभिनयाची आवड
1957 मध्ये निळू फुले यांनी 'येरागबाळ्याचे काम नोहे' या लोकनाट्यात पहिल्यांदा काम केले. पु. ल. देशपांडे यांच्या 'पुढारी पाहीजे' या नाटकातून त्यांच्या 'रोंगे' या भूमिकेने सर्वांचे लक्ष वेधले. कथा अकलेच्या कांद्याची' या वगनाट्यामुळे त्यांना खरी प्रसिद्धी मिळाली. एकेकाळी नाटक पाहणारे रसिक निळू फुले यांचा अभिनय पाहण्यासाठी हजेरी लावयची. रंगभूमीवर 'सूर्यास्त,' 'घरंदाज,' 'रण दोघांचे,' 'सखाराम बाईंडर,' 'जंगली कबुतर' आणि 'बेबी' ही त्यांची नाटके तर 'पुढारी पाहीजे,' 'कोणाचा कोणाला मेळ नाही,' 'कथा अकलेच्या कांद्याची,' 'लवंगी मिरची - कोल्हापूरची,' 'राजकारण गेलं चुलीत' ही प्रमुख लोकनाट्ये गाजली.
समाजकार्यात ही अग्रेसर
समाजसुधारक परिवाराचा वारसा असल्यामुळे त्यांना लोकांसाठी काम करण्याचे आवड होतीच. ज्यानुसार,निळू फुलेंनी कलाकार म्हणून काम करत असताना सेवादलाचा कार्यकर्ता म्हणून समाजाची सेवा केली. अंधश्रद्धा निर्मूलनासाठीही त्यांनी अनेक प्रयत्न केले.
रुपेरी पडद्यावर निळूभाऊंची किमया
निळू फुलेंनी 'एक गाव बारा भानगडी' या चित्रपटातून मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं होतं. त्यानंतर सलग 40 वर्षे त्यांनी चित्रपटसृष्टी आणि रंगभूमी गाजवली. जवळपास 140 पेक्षा अधिक मराठी चित्रपट आणि 12 हिंदी चित्रपटांतून निळू फुले यांनी काम केलंय. यापैकी 'सामना', 'सिंहासन', 'पुढचं पाऊल', 'शापित' यामध्ये साकारलेल्या त्यांच्या भूमिका विशेष गाजल्या. 'पिंजरा' चित्रपटातील निळू फुलेंची भूमिका प्रेक्षकांच्या मनात घर करून राहिलीय.
हिंदी सिनेमात सुद्धा पाडली छाप
निळू फुले यांनी हिंदी चित्रपटातही काम केलं होतं. 'जरासी जिंदगी,' 'रामनगरी,' 'नागीन-२,' 'मोहरे,' 'सारांश,' 'मशाल,' 'सूत्रधार,' वो सात दिन,' 'नरम गरम,' 'जखमी शेर,' 'कुली' या चित्रपटांतूनही आपली वेगळी प्रतिमा तयार केली.
मानाच्या पुरस्कारांचे धनी
निळु फुले यांना, हाथ लावीन तिथे सोने (1973), सामना (1974), चोरीचा मामला (1975) या सिनेमासाठी महाराष्ट्र सरकारचा उत्कृष्ट अभिनेता हा पुरस्कार तीन वेळा मिळाला होत. अनंतराव भालेराव पुरस्कार, संगीत नाटक अकादमी आदी पुरस्कारही त्यांना मिळाले होते.
मुलीने चालवला अभिनयाचा वारसा
निळू फुले यांचे 2009 मध्ये अन्ननलिकेच्या कर्करोगाच्या आजाराने निधन झाले मात्र त्यांच्या अभिनयाचा वारसा त्यांची मुलगी, गार्गी फुले थत्ते यांनी सुरु ठेवला आहे. अलीकडेच झी मराठी वर सुरु असणाऱ्या तुला पाहते रे या मालिकेतून गार्गी यांनी आपल्या अभिनयाने सर्वना भुरळ पाडली आहे.
अशा या अजरामर नटाला, स्मृतिदिनाच्या निमित्ताने, मनःपूर्वक श्रद्धांजली!