कंगना राणावतचे स्वतःला वाढदिवसाचे गिफ्ट; ध्यानधारणा करत पाळणार 10 दिवस मौनव्रत
कंगना राणावत (Photo Credits: Yogen Shah)

आपल्या विवादित वक्त्यव्यांसाठी लोकप्रिय असणारी आघाडीची अभिनेत्री म्हणजे कंगना राणावत. (Kangana Ranaut). मणिकर्णिकाच्या यशामुळे तर तिच्या लोकप्रियतेमध्ये अजूनच भर पडली. कंगना येत्या 23 मार्चला आपला 32 वा वाढदिवस साजरा करणार आहे. या वाढदिवसानिमित्त कंगनाने स्वतःला एक हटके गिफ्ट द्यायचे ठरवले आहे. कंगनाने वाढदिवसाच्या आधी 10 दिवस मौनव्रत पाळायचे ठरवले आहे. कंगणाने एक वेलनेस प्रोग्रॅमसाठी स्वतःची नावनोंदणी करण्याचा निर्णय घेतला आहे, ज्यामुळे तिला बऱ्याच तासांसाठी ध्यान-धारणा करावी लागणार आहे. या काळात कंगना कोणाशीही बोलणार नाही, तिने पूर्णतः मौन पाळायचे ठरवले आहे.

कंगना बऱ्याच दिवसांपासून अशाप्रकारचे मेड‍िटेशन करण्याचा विचार करत होती, मात्र आता वाढदिवसाच्या निमित्ताने तिने ही इच्छा तडीस न्यायची ठरवले आहे. याबाबत कंगना म्हणते, 'मी बरेच दिवस अशा प्रोग्रॅमचा विचार करत होते. मात्र आता वाढदिवसाच्या निमित्ताने असे काही करण्याची संधी मला मिळत आहे. मौनव्रत पाळणे ही एक मोठी वचनबद्धता आहे, आणि हेच माझे सर्वात मोठे वाढदिवसाचे गिफ्ट असणार आहे.’ (हेही वाचा: माझ्यासारखे आयुष्य माझ्या मुलांच्या वाट्याला नको- कंगना रानौत)

कंगना तिच्या फिटनेसबद्दल अतिशय जागरूक आहे. ती नियमित योग करत असते, आता या रिट्रीट प्रोग्रॅमद्वारे ती ध्यानधारणा आणि मौनव्रत पळणार आहे. या कार्यक्रमासाठी 6 महिन्यांपासून तयारी करावी लागते, जी कंगना इतके महिने करत होती. नुकतीच कंगनाने मणिकर्णिकाची सक्सेस पार्टी आयोजित केली होती, आता राजकुमार राव सोबतचा तिचा ‘मेंटल हैं क्या’ लवकरच प्रदर्शित होईल.