
भारतात्त प्रत्येकाला आपली मते मांडण्याचा, आपले विचार बोलून दाखवण्याचा पूर्ण अधिकार आहे. मात्र काही वेळा यामुळे लोकांच्या भावना दुखावल्या जातात. काहीवेळा चुकीचा संदेश लोकांपर्यंत पोहचतो. चित्रपटांसाठी तर नेहमीच ही गोष्ट लागू होते. समाजासाठी चित्रपटाचा विषय आणि त्याचे सादरीकरण ही फार संवेदनशील गोष्ट आहे. म्हणूनच समाजाला आरसा दाखवला तर त्यातले प्रतिबिंब जनता सहजासहजी स्वीकारू शकत नाही, यासाठी भारताचे सेन्सॉर बोर्डही अतिशय कार्यशील आहे. म्हणूनच विविध कारणे देऊन गेल्या 16 वर्षांमध्ये सेन्सॉर बोर्डा (CBFC) ने तब्बल 793 चित्रपटांवर भारतात बंदी घातली आहे. यामध्ये 586 चित्रपट हे भारतीय आहेत तर, 207 चित्रपट परदेशी आहेत.
सेक्स, गुन्हेगारी, लोकांच्या जातीय भावना दुखावणारा कंटेंट तसेच अशाचप्रकारे चित्रपटाचे नाव या कारणांनी यांवर बंदी घालण्यात आली आहे. भाषेबद्दल बोलायचे झाले तर, तमिळ 96, तेलगू 53, कन्नड 39, मल्याळम मधील 23, पंजाबीतील 17. बंगाली आणि मराठीमध्ये 12 चित्रपटांवर बंदी घालण्यात आली आहे. नावामुळे बंदी घालण्यात आलेल्या चित्रपटांमध्ये, आदमखोर हसीना, कातिल शिकारी, प्यासी चांदणी, मधुर स्वप्नम, खुनी रात, शमशान घाट, मंचली पडोसन आणि सेक्स विज्ञान अशा चित्रपटांचा समावेश आहे. (हेही वाचा: ‘अखिल भारतीय सिने कामगार संघटने’कडून पाकिस्तानी कलाकारांवर भारतात बंदी)
सेन्सॉर बोर्डाने परझानिया (इंग्रजी -2005), अस्थोमा सतगमय (तमिळ -2012) आणि मोहल्ला अस्सी (हिंदी-2015) अशा काही महत्वाच्या चित्रपटांवरही बंदी घातली आहे. खुप प्रयत्नानंतर यावर्षी मोहल्ला अस्सी प्रदर्शित करण्यात आला. 2015-16 या काळात सर्वाधिक म्हणजे 153 चित्रपटांवर बंदी घालण्यात आली. त्यानंतर 2014 - 15 मध्ये 152 चित्रपट, 2013 - 14 मध्ये 119 आणि 1012-13 मध्ये 82 चित्रपटांना प्रदर्शनाचे प्रमाणपत्र नाकारण्यात आले आहे.