साजिद खान (Photo Credit: Twitter)

विधानसभा निवडणुकांमुळे शांत झालेला #MeToo मुद्दा पुन्हा डोके वर काढत आहे. नाना पाटेकरांवर एका अभिनेत्रीने केलेल्या आरोपानंतर अनेक दिग्गजांनी केलेल्या शारीरिक छळाची प्रकरणे बाहेर यायला सुरुवात झाली. कैलाश खेर, अन्नू मलिक, आलोकनाथ यांसोबतच अजून एक लोकप्रिय नाव यात समोर आले ते म्हणजे साजिद खान. अभिनेत्री सिमरन सूरी, रेचल व्हाइट, करिश्मा उपाध्याय, सलोनी चोप्रासह अनेक महिलांनी साजिदच्या गैरवर्तनाचा पाढा वाचला होता. याच कारणामुळे साजिदला हाउसफुल 4च्या दिग्दर्शीय पदावरुनही पायउतार व्हावे लागले होते. आता केलेल्या गैरवर्तनाचा फटका साजिदला चांगलाच बसला आहे, कारण इंडियन फिल्म अ‍ॅण्ड टेलिव्हिजन डायरेक्टर्स असोसिएशन अर्थात आयएफटीडीए ((IFTDA) ने काल रात्री साजिदला निलंबित केले आहे. साजिदला याबाबतीत एक नोटीस पाठवून याची माहिती देण्यात आली आहे.

आयएफटीडीएची आयसीसी कमिटी सध्या #MeToo संबंधित प्रकरणांचा तपास करीत आहे. साजिदने केलेल्या गुन्ह्याबद्दल कडक पावले उचलत साजिदला तूर्तास एक वर्षासाठी निलंबित केले आहे.  साजिदवर झालेल्या आरोपानंतर साजिदची बहिण फराह खान व चुलत भाऊ फरहान अख्तर या दोघांनीही त्याच्या पाठीशी उभे राहण्यास नकार दिला. त्याने केले असेल तर त्याला भोगावेच लागेल, असे फराह म्हणाली होती. (हेही वाचा : बॉलीवूड अभिनेता राजपाल यादवला तीन महिन्यांची तुरुंगवासाची शिक्षा, पहा काय आहे कारण)

याबाबत बोलताना, या प्रकारांमुळे माझ्या करिअरचे अतोनात नुकसान झाले आहे असे साजिद म्हणाला होता. त्यानंतर त्याला स्वतःची बाजू मांडण्याची संधी आणि वेळ देण्यात आली होती, तरी साजिद शांतच राहिला; त्यानंतर लैंगिक गैरवर्तणुकीचे गंभीर आरोप, शरीरसुखाची मागणी करणे, गैरफायदा घेणे, असभ्य वर्तन करणे यासारख्या आरोपांमुळे त्याच्यावर कारवाई करत असल्याचे संघटनेने म्हटले आहे.