बॉलीवूड अभिनेता राजपाल यादवला तीन महिन्यांची तुरुंगवासाची शिक्षा, पहा काय आहे कारण
राजपाल यादव (Photo Credits: Instagram)

बॉलीवूड अभिनेता राजपाल यादव (Rajpal Yadav) ला दिल्ली हायकोर्टाने तीन महिन्यांची तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. 2010 मध्ये राजपाल यादवने एका व्यक्तीकडून 5 करोड रुपयांचे कर्ज घेतले होते. मात्र हे कर्ज राजपाल यादव फेडू शकला नाही. या गोष्टीबद्दल त्या व्यक्तीने कोर्टाचे दरवाजे ठोठावले होते. कोर्टाने राजपाल यादवला एकूण 10 करोड 40 लाख इतकी रक्कम त्या व्यक्तीला परत देण्यास सांगितले होते. मात्र ही रक्कमही राजपाल यादव चुकती करू शकला नाही. मात्र आता कोर्टाने यावर सक्त कारवाई करत राजपाल यादवला 3 महिन्यांसाठी तुरुंगात पाठवले आहे.

इंदौरच्या सुरेंदर सिंह यांच्याकडून दिग्दर्शीय पदार्पणाचा चित्रपट 'अता पता लापता' (Ata Pata Laapata) बनवण्यासाठी राजपाल यादवने पाच करोड रुपये उधार घेतले होते. ही रक्कम परत देताना राजपालने मुंबईतील अॅक्सिस बँकेचा चेक सुरेंदर सिंहला दिला होता. सप्टेंबर 2015 ला हा चेक बँकेत जमा केल्यावर तो बाऊंस झाला. यानंतर सुरेंदरने सिंहने वकिलांच्यामार्फत यादवला यासंबंधी नोटीस पाठवली. नोटीस मिळूनही यादवने पाच करोड रुपये भरले नाही. शेवटी सिंह यांनी राजपाल विरोधात केस दाखल केली. याप्रकरणाबाबत न्यायालयाने राजपालला तीन महिन्यांसाठी तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे.

2 नोव्हेंबर 2012 साली राजपाल यादवचा ‘अता पता लापता’ चित्रपट प्रदर्शित झाला. मात्र हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सपशेल आपटला होता, यामुळे राजपालचे कर्ज अजूनच वाढत गेले. राजपाल यादवने बॉलिवूडमध्‍ये 'हंगामा,' 'वक्त,' 'चुप चुप के,' 'गरम मसाला,' 'फिर हेरा फेरी,' 'ढोल' यासारख्‍या लोकप्रिय चित्रपटांमध्‍ये काम केले आहे.