Top Global Asian Celebrity 2020: आशियाई सेलिब्रिटी 2020 च्या यादीत अभिनेता Sonu Sood अव्वल स्थानावर; अमिताभ बच्चन, प्रियंका चोप्रा, प्रभास यांना टाकले मागे
Sonu Sood | (Photo Credits: Facebook)

कोरोना व्हायरससारख्या (Coronavirus) साथीच्या रोगादरम्यान, देशातील गरजूंसाठी एक देवदूत म्हणून समोर आलेला बॉलिवूड अभिनेता सोनू सूदच्या (Sonu Sood) शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. गेल्या काही महिन्यांमधील आपल्या कामगिरीमुळे सोनू सूदला ग्लोबल एशियनच्या यादीत (Top Global Asian Celebrity 2020) अव्वल स्थान प्राप्त झाले आहे. यूके साप्ताहिक वृत्तपत्र 'ईस्टर्न आय'ने प्रकाशित केलेल्या 'जगातील 50 आशियाई सेलिब्रिटी' च्या यादीमध्ये अव्वल असलेल्या, 47 वर्षीय बॉलिवूड अभिनेत्यास गेल्या काही दिवसांमध्ये कोरोना काळात अनेक संकटांचा सामना करावा लागला आहे.

या यादीच्या मिडियामधील अशा कलाकारांना स्थान देण्यात आले आहे व अशा कलाकारांचा गौरव करण्यात आला आहे, ज्यांनी आपल्या कामाने समाजात सकारात्मक छाप पाडली आहे व लोकांना प्रेरणा दिली आहे. सिनेमा, संगीत आणि फॅशन या जगातील इतर भारतीय सेलिब्रिटींचादेखील या यादीत समावेश आहे.

या सन्मानाबद्दल अभिनेता सोनू सूदने कृतज्ञता व्यक्त केली आहे. तो म्हणाला, 'माझे प्रयत्न ओळखून मला हा सन्मान दिल्याबद्दल ईस्टर्न आयचे आभार. हा साथीचा रोग जसजसा वाढायला लागला तसतसे मला समजले की माझ्या देशवासियांना मदत करणे हे माझे कर्तव्य आहे. ही एक अशी गोष्ट होती जी आतूनच बाहेर पडली. मी जे काही केले ते एक भारतीय म्हणून माझी जबाबदारी होती आणि शेवटच्या श्वासापर्यंत मी ती पार पाडेन.'

याबाबत ईस्टर्न आय चे संपादक म्हणाले की, ‘सोनू सूद हा या सन्मानासाठी पूर्णपणे पात्र आहे. कोरोना साथीच्या आणि लॉकडाऊनच्या काळात लोकांसाठी त्याने ज्या प्रकारे मदत केली ते कौतुकास्पद आहे, तसेच इतर लोकांनाही ते प्रेरणादायक आहे.’ (हेही वाचा: गरजूंना मदत करण्यासाठी Sonu Sood ने उचलले मोठे पाऊल; स्वतःच्या 8 मालमत्ता गहाण ठेऊन घेतले 10 कोटींचे कर्ज)

या यादीमध्ये कॅनेडियन यू ट्यूबर, सोशल मीडिया स्टार, कॉमेडीअन आणि टीव्ही व्यक्तिमत्व लिली सिंग दुसर्‍या क्रमांकावर आहे. हाफ-भारतीय ब्रिटिश पॉप सुपरस्टार चार्ली एक्ससीएक्स (Charli XCX) तिस्या क्रमांकावर आहे. ब्रिटीश अभिनेता देव पटेल चौथ्या क्रमांकावर आहे. भारतीय गायक अरमान मलिक पाचव्या स्थानी तर प्रियंका चोप्रा सहाव्या स्थानी आहे. या यादीमध्ये पुढे प्रभास (7), हॉलिवूडची पॉवर प्लेयर मिंडी कलिंग (8), सुरभी चंदना (9) आणि पाकिस्तान-बॉर्न हॉलीवुड हेवीवेट कुमेल नानजियानी (10) हे अव्वल दहामध्ये आहेत.