गरजूंना मदत करण्यासाठी Sonu Sood ने उचलले मोठे पाऊल; स्वतःच्या 8 मालमत्ता गहाण ठेऊन घेतले 10 कोटींचे कर्ज 
Sonu Sood | (Photo Credits: Facebook)

लॉक डाऊनच्या (Lockdown) काळात अनेकांना आर्थिक समस्येचा सामना करावा लागला होता. या काळात लोकांचे काम बंद पडले, नोकऱ्या गेल्या परिणामी शहरातील लाखो कामगार आपल्या गावी परतले. अशावेळी बॉलिवूड अभिनेता सोनू सूद (Sonu Sood) या लोकांच्या मदतीला धावून आला होता. लोकांना त्यांच्या त्यांच्या घरी पोहोचवणे असो वा त्यांना नोकऱ्या मिळवून देणे असो, इतकेच काय तर या कोरोनाच्या काळात सोनूने लोकांना घरे मिळवून देण्यासही मदत केली होती. आता यापुढे जाऊन सोनू सूदने एक आश्चर्यचकित करणारे पाऊल उचलले आहे. गरजू लोकांना मदत करण्यासाठी सोनूने आपल्या आठ मालमत्ता गहाण ठेवल्या आहेत. याद्वारे त्याने 10 कोटींचे कर्ज घेतले आहे.

या सर्व मालमत्ता 48 वर्षीय सोनू सूद आणि त्याची पत्नी सोनाली यांच्या नावावर आहेत. यामध्ये दोन दुकाने आणि सहा अपार्टमेंट यांचा समावेश आहे. या सर्व मालमत्ता मुंबईचा पॉश भाग जुहू परिसरामध्ये आहेत. मनीकंट्रोलकडे उपलब्ध असलेल्या नोंदणीच्या कागदपत्रांनुसार, अभिनेताने जुहू येथील शिव सागर सीजीएचएस मधील तळ मजल्यावरील दोन दुकाने आणि सहा फ्लॅट गहाण ठेवले आहेत. मुंबईतील इस्कॉन मंदिराजवळ ही इमारत एबी नायर रोडलगत आहे. सोनू सूदने 15 सप्टेंबर रोजी स्टँडर्ड चार्टर्ड बँकेबरोबर करार केला आणि 24 नोव्हेंबर रोजी कर्जाची नोंद झाली. सोनू सूदने 10 कोटी कर्जासाठी नोंदणी फी म्हणून 5 लाख रुपये दिले आहेत. (हेही वाचा: Farmers Protest: प्रीति जिंटा आणि सोनम कपूर यांचा शेतक-यांच्या आंदोलनाला पाठिंबा, सोशल मिडियावर पोस्ट करत दिली 'ही' माहिती)

दरम्यान, सोनू सूदने लॉकडाऊनमध्ये अडचणीमध्ये अडकलेल्या अनेक गरीब मजुरांना त्यांच्या घरी पोहोचवण्यासाठी मदत केली होती. इतकेच नाहीतर देशाबाहेरील विद्यार्थ्यांना भारतामध्ये परत घेऊन येण्यासाठीही सोनूने विमानची व्यवस्था केली होती. सोनू सूदच्या अशा मदतीचे देशभरामध्ये कौतुक झाले होते. सोनू सूदच्या या कृत्यामुळे त्याला युनायटेड नेशन्सचा प्रतिष्ठित SDG Special Humanitarian Action Award देण्यात आला आहे.