Ajay Devgan (Photo Credits: Twitter)

देशाचे राजकारण आणि बॉलिवूड यांच्यात गहिरे संबंध आहेत. राजकारणात एखादी मोठी उलथापालथ झाली तर बॉलिवूडमध्ये त्यावर हमखास चित्रपट बनतो. तसेच देशात कोणतीही मोठी घटना घडल्यास त्यावरील चित्रपट बनवण्यातही उशीर होत नाही. आता बातमी आली आहे की, अभिनेता अजय देवगण (Ajay Devgn) गलवान खोऱ्यात (Galwan Valley) शहीद झालेल्या 20 सैनिकांच्या शौर्यावर चित्रपट बनवणार आहे. चित्रपट समीक्षक तरण आदर्शने (Taran Adarsh) याबाबत सोशल मीडियाच्याद्वारे माहिती दिली आहे. गेले काही दिवस याबाबत चर्चा होती, मात्र आता याबाबत तरण आदर्श यांनी शिक्कामोर्तब केले आहे.

त्यांनी ट्विट केले आहे की, ‘अजय देवगन गलवान खोऱ्यात झालेल्या झटापटीवर चित्रपट बनवणार आहे. चित्रपटाच्या शीर्षकाचा अद्याप विचार केलेला नाही. या चित्रपटात चिनी सैन्यासह जोरदार लढा देणाऱ्या 20 सैनिकांची कहाणी दाखविली जाणार आहे. चित्रपटाच्या कलाकारांचादेखील अद्याप विचार झाला नाही. अजय देवगण एफफिल्म्स (Ajay Devgn FFilms) आणि सिलेक्ट मीडिया होल्डिंग्ज एलएलपी (Select Media Holdings LLP) या चित्रपटाची निर्मिती करणार आहेत.’

या पूर्वीही अजय देवगणने सत्य घटनेवर आधारीत चित्रपट बनवले आहेत. अजयने नुकताच तानाजी मालुसरे यांच्या ‘सिंहगड’ किल्ल्याच्या विजयावर ‘तान्हाजी’ हा चित्रपट बनवला होता, ज्याचा लोकांचा चागलाच प्रतिसाद दिला होता. आता दिग्दर्शक अभिषेक दुधय्या दिग्दर्शित ‘भुज: द प्राइड ऑफ इंडिया’ या चित्रपटात अजय मुख्य भूमिकेत दिसणार आहे. लॉकडाऊनमुळे हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होईल. दुसरीकडे अभिषेक बच्चनच्या 'द बिग बुल' या चित्रपटाची निर्मितीही अजयने केली आहे, जो ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. (हेही वाचा: अभिनेता अक्षय कुमार याचा नाशिक दौरा वादाच्या भोवऱ्यात; पालकमंत्री छगन भुजबळ यांच्याकडून चौकशीचे आदेश)

दरम्यान, 15 जून रोजी लडाखच्या पूर्वेकडील गलवान व्हॅलीमध्ये चिनी सैन्य आणि भारतीय सैन्य यांच्यात झटापट झाली होती. या चकमकीत 20 भारतीय सैनिक शहीद झाले. 1975 नंतर प्रथमच भारत-चिनी सैन्यात अशी हिंसक झटापट झाली आहे. 1975 मध्ये अरुणाचल प्रदेशमध्ये चिनी सैन्याच्या जवानांनी भारतीय सैन्याच्या गस्तवर हल्ला केला होता.