Sonam Kapoor with her husband Anand Ahuja (Photo Credits: Instagram)

नुकतेच हिजाबबाबतच्या वक्तव्यामुळे ट्रोल झालेली बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूर (Sonam Kapoor) पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. अभिनेत्रीचा पती बिझनेसमन आनंद आहुजा (Anand Ahuja) याच्यावर एका आंतरराष्ट्रीय शिपिंग कंपनीने फसवणुकीचा आरोप केला आहे. आनंद आहुजावर टॅक्स आणि कस्टम ड्युटी चुकवण्यासाठी कागदपत्रांमध्ये फेरफार केल्याचा आरोप आहे. आनंद आहुजाने जानेवारी 2022 मध्ये एका आंतरराष्ट्रीय शिपिंग कंपनीला उद्द्शून त्यांच्या ग्राहक सेवेविरोधात ट्विट केले होते.

आता कंपनीने आनंदवर इनव्हॉइसमध्ये छेडछाड केल्याचा आरोप केल्याचे वृत्त आहे. अशा इनवॉइसचा वापर करून कर आणि कस्टम ड्युटी भरणे टाळता येते. कंपनीने ट्विट करून, समस्या त्यांच्या सेवेत नसून आनंदने दिलेल्या कागदपत्रांमध्ये असल्याचे नमूद केले आहे. मात्र, आनंद आहुजाने आपल्यावरील हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. आपली बदनामी करण्यासाठी कंपनीने बिनबुडाचे आरोप केले आहेत, असे आनंदने म्हटले आहे.

या आरोपांनंतर सोशल मीडियावर चर्चेला उधाण आले आहे. ही एक आंतरराष्ट्रीय कंपनी असल्याने फक्त भारतातच नाही तर आंतरराष्ट्रीय स्तरावरही याबाबत चर्चा सुरु आहे.

हे सर्व सुरु झाले आनंदच्या जानेवारीमधील एका ट्विटपासून, ज्यामध्ये त्याने लिहिले की होते की, ‘कोणी @MyUS_Shopaholic मध्ये कोणाला ओळखते का? मला नुकताच त्यांचा एक भयानक अनुभव आला. ते चुकीच्या पद्धतीने माझे समान अडकवून ठेवत आहेत. माझे औपचारिक कागदपत्र नाकारले जात आहेत आणि माझे म्हणणे ऐकून घेत नाहीत.’ हे ट्विट सोनम कपूरनेही रिट्विट केले होते.

यानंतर आता कंपनीने यावर प्रतिक्रिया दिली असून आनंदवर फसवणुकीचा आरोप करण्यात आला आहे. कंपनीने म्हटले आहे, ‘हे प्रकरण कस्टमर सेवेशी निगडीत नाही. आनंदने शेअर केलेली इनव्हॉइस किंमत त्याने पाठवलेल्या उत्पादनाच्या पेमेंटपेक्षा 90 टक्के कमी आहे.’ म्हणजेच आनंदने कर चुकवण्यासाठी इनव्हॉइसमध्ये फेरफार केला आहे. (हेही वाचा: Rakhi Sawant आणि पती Ritesh होणार विभक्त, अभिनेत्रीने सोशल मीडियात पोस्ट करत चाहत्यांना दिला धक्का)

आनंदने ‘ईबे’ या साईटवरून शूज विकत घेतले होते. त्याने या शूजसाठी जितके रुपये भरले त्यापेक्षा 90 टक्के कमी रुपये त्याने इनव्हॉइसमध्ये नमूद केले असे कंपनीचे म्हणणे आहे. शेवटी, ‘ग्राहकांच्या सर्व समस्या पूर्णपणे सोडवल्या पाहिजेत. हे आपले कर्तव्य आहे’,असे कंपनीने म्हटले आहे.