PM Narendra Modi Biopic (Photo Credits-Twitter)

कोरोना विषाणूमुळे (Coronavirus) देशभर चित्रपटगृहे बराच काळ बंद आहेत. केंद्राने निर्बंधामध्ये शिथिलता आणल्यानंतर, आता 15 ऑक्टोबरपासून पुन्हा थिएटर (Theatres) उघडण्याची तयारी सुरू आहे. बर्‍याच चित्रपटांचे प्रदर्शन गेल्या काही काळापासून अडकले होते, त्यातील काही चित्रपट ऑनलाइन रिलीज झाले होते. आता काही चित्रपट चित्रपटगृहे सुरु झाल्यानंतर पुन्हा प्रदर्शित केले जाणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा बायोपिकही (PM Narendra Modi Biopic) पुन्हा प्रदर्शित होणार असल्याचे वृत्त आहे. ट्रेड अॅनालिस्ट तरण आदर्श यांनी सोशल मीडियावर पीएम नरेंद्र मोदी चित्रपटाचे पोस्टर नवीन रिलीज तारखेसह शेअर केले आहे.

याबाबत केलेल्या पोस्टमध्ये तरण आदर्श म्हणतात, ‘पुढच्या आठवड्यात चित्रपट गृहात ‘पीएम नरेंद्र मोदी’ हा विवेक ओबेरॉयची मुख्य भूमिका असलेला चित्रपट पुढच्या आठवड्यात चित्रपटगृहात प्रदर्शित होत आहे.’ 'पीएम नरेंद्र मोदी' हा चित्रपट 24 मे 2019 रोजी प्रथम प्रदर्शित झाला होता. त्यावर्षी देशात लोकसभा निवडणुका झाल्या ज्यामुळे या चित्रपटाच्या रिलीजबाबत बराच वादंग माजला होता. त्यावेळी हा चित्रपट काही खास कमाई करू शकला नव्हता.(PM Narendra Modi Biopic Trailer: पंतप्रधान नरेंद्र मोदी बायोपिक ट्रेलरमध्ये RSS पासून ते पंतप्रधान होण्यापर्यंतच्या प्रवासाची झलक)

ओमंग कुमार दिग्दर्शित या चित्रपटामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा गुजरातचे मुख्यमंत्री होण्यापासून ते 2014 च्या लोकसभा निवडणुकीत ऐतिहासिक विजय मिळविण्यापर्यंतचा प्रवास दाखवला आहे. याबाबत ओमंग कुमार म्हणाले, ‘सिनेमागृहे पुन्हा सुरू होणार आहेत याचा मला आनंद व समाधान आहे आणि आम्ही आमचा चित्रपट‘ ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी’ पुन्हा प्रदर्शित करत आहोत. हा चित्रपट तयार करण्यासाठी आम्ही खूप परिश्रम घेतले आहेत आणि ज्यांनी हा चित्रपट अजून पहिला नसेल त्यांना आता हा चित्रपट पाहण्याची संधी मिळेल. आमच्या कष्टाची कमाई असलेला चित्रपट प्रत्येकाने पाहावा अशी आमची इच्छा आहे.’ संपूर्ण भारतभर हा चित्रपट प्रदर्शित करण्याची तयारी सुरु असल्याचे सांगितले जात आहे.