PVR Inox to Screen T20 Cricket World Cup: कोरोनाच्या काळापासून थिएटर इंडस्ट्री प्रेक्षकांच्या कमतरतेशी झगडत आहे. भारतातील सर्वात मोठा सिनेमा ऑपरेटर ‘पीव्हीआर आयनॉक्स’ (PVR Inox) देखील प्रेक्षकांच्या उदासीनतेचा सामना करत आहे. अशा परिस्थितीत कंपनीने आता पैसे कमावण्यासाठी क्रिकेटची मदत घेण्याचा निर्णय घेतला आहे. प्रेक्षकांना आकर्षित करण्यासाठी पीव्हीआर आयनॉक्स टी-20 वर्ल्ड कपचे खास सामने दाखवण्याची तयारी करत आहे. आयसीसी टी-20 विश्वचषक 2 जूनपासून सुरू होणार आहे.
कोरोना काळात ओटीटीची क्रेझ वाढली. अशा परिस्थितीत प्रेक्षक चित्रपटगृहांपासून दूर राहिले. Netflix, Amazon Prime सारखे प्लॅटफॉर्म चांगल्या चित्रपटांचे हक्क विकत घेत आहेत, तसेच स्वतःही चित्रपट, शोजची निर्मिती करत आहेत यामुळे प्रेक्षकांना घरबसल्या उत्तम कंटेंट पाहता येऊ लागला, परिणामी थिएटर उद्योगाच्या अडचणी वाढल्या.
हे पाहता आता पीव्हीआर आयनॉक्सला पैसे कमावण्यासाठी केवळ चित्रपटांवर अवलंबून राहायचे नाही. आर्थिक फायद्यासाठी चित्रपटगृहांमध्ये क्रिकेटचे सामने आणि मैफिली दाखवण्याचाही ते गांभीर्याने विचार करत आहेत. बिझनेस स्टँडर्डच्या अहवालानुसार, कंपनीचे मुख्य वित्तीय अधिकारी नितीन सूद म्हणाले की, कंपनी पुढील महिन्यात सुरू होणाऱ्या टी20 विश्वचषकाचे महत्त्वाचे सामने थिएटरमध्ये दाखवेल. भारतात अत्यंत लोकप्रिय असलेले टी20 क्रिकेट हे नक्कीच प्रेक्षकांना चित्रपटगृहांकडे आकर्षित करेल, असा त्यांचा विश्वास आहे. याशिवाय भारतीय प्रेक्षकांना आकर्षित करण्यासाठी के-पॉप परफॉर्मन्स आणण्यावरही विचार केला जात आहे. (हेही वाचा: Aishwary Thackeray: बाळासाहेब ठाकरे यांचा नातू ऐश्वर्य लवकरच रुपेरी पडद्यावर, बॉलिवुड चित्रपटातून करणार अभिनयात पदार्पण)
दरम्यान, आर्थिक वर्ष 2024 च्या चौथ्या तिमाहीत कंपनीला 130 कोटी रुपयांचा तोटा झाला आहे. मात्र, वर्षभरापूर्वीच्या तुलनेत मार्च तिमाहीत तोटा कमी झाला आहे. पीव्हीआर-आयनॉक्सचा एकत्रित तोटा वार्षिक आधारावर 333 कोटी रुपयांवरून 130 कोटी रुपयांवर घसरला आहे. त्याचप्रमाणे उत्पन्न 1143 कोटी रुपयांवरून 1256 कोटी रुपये (YoY) वाढले आहे.