गेल्या काही दिवसांपासून 93 व्या अकादमी पुरस्कारांसाठी (93rd Academy Awards) भारताकडून नक्की कोणता चित्रपट जाणार याबाबत चर्चा सुरु होती. आता याचे उत्तर समोर आले आहे. 93 ऑस्कर पुरस्कारासाठी (Oscars Awards) भारताकडून मल्याळम चित्रपट 'जल्लीकट्टू' (Jallikattu) ही ऑफिशियल एन्ट्री असणार आहे. फिल्म फेडरेशन ऑफ इंडिया (Film Federation of India) यांनी ही माहिती दिली. दिग्दर्शक Lijo Jose Pellissery यांचा हा चित्रपट एक ड्रामा थ्रिलर आहे. 27 भारतीय चित्रपटांमधून ‘जल्लीकट्टू’ ची निवड झाली आहे. भारताकडून हा चित्रपट ‘सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय चित्रपट’ श्रेणीमध्ये हा चित्रपट पाठवला जाणार आहे.
भारताकडून ऑस्करसाठी चित्रपट पाठवण्याच्या शर्यतीमध्ये अनेक लोकप्रिय समाविष्ट होते. यामध्ये शकुंतला देवी, शिकारा, गुंजन सक्सेना, भोसले, गुलाबो सिताबो, सीरियस मॅन, बुलबुल, कामयाब, द स्काय इज पिंक, छपाक अशा हिंदी चित्रपटांचा समावेश होता. तर यामध्ये चैतन्य ताम्हनेचा व्हेनिस आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव जिंकणारा मराठी चित्रपट डिसायपलचाही समावेश होता.
Malayalam film 'Jallikattu' India's official entry at Oscars in International Feature Film category: Film Federation of India
— Press Trust of India (@PTI_News) November 25, 2020
14 सदस्यांच्या मंडळाने बहुमताने ‘जल्लीकट्टू’ या चित्रपटाची निवड केली आहे. याबाबत फिल्म फेडरेशन ऑफ इंडियाचे रावेल म्हणाले, 'हा चित्रपट मानवी वृत्ती प्राण्यांपेक्षा वाईट असल्याचे दर्शवितो. यातील विविधांगी पात्रे आणि त्यांचे स्थान तसेच इतर तांत्रिक आणि मानवी बाबींमुळे या चित्रपटाचे पॅकेज सर्वोत्कृष्ट ठरले. अभिमान बाळगावा अशी ही कलाकृती आहे.'
एस. हरीश यांच्या Maoist या लघुकथेवर हा चित्रपट बेतलेला आहे. हा चित्रपट मनुष्य आणि प्राण्यांमधील भावनांचे दर्शन घडवतो. Antony Varghese ने यामध्ये मध्यवर्ती भूमिका साकारली आहे. हा चित्रपट तुम्ही Amazon Prime वर ऑनलाईन पाहू शकता. त्यासाठी तुम्हाला Amazon Prime ची मेंबरशिप घेणे गरजेचे आहे. (हेही वाचा: भूमि पेडनेकर च्या 'दुर्गामती' सिनेमाचा ट्रेलर आऊट; भीती, सूड यांनी भरलेला रोमांचक सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला)
दरम्यान, गेल्या वर्षी अपर्णा सेन यांच्या नेतृत्वाखालील एफएफआय ज्यूरीने झोया अख्तरच्या गल्ली बॉयला ऑस्करसाठी निवडले होते. चित्रपटाने शॉर्टलिस्टमध्ये स्थान मिळवले नव्हते व त्यावेळी दक्षिण कोरिअन चित्रपट पॅरासाइटने ऑस्करसाठी बाजी मारली होती.