मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टी गाजवणारे ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर (Nana Patekar) यांच्या विरोधात अभिनेत्री तनुश्री दत्ता (tanushree Dutta) हिने लैंगिक शोषणाचा आरोप केला होता. त्यानंतर जगभरात सुरु असलेल्या #MeToo चळवळीने भारतात जोर धरला होता. त्यात अलीकडेच तनुश्रीने नाना पाटेकर यांनी 'नाम' संस्थेच्या नावावर कोट्यवधींचा भ्रष्टाचार केल्याचे म्हटले होते. या विरोधात नाम संस्थेने कठोर पावले उचलत तनुश्री दत्तावर 25 कोटींचा मानहानीचा दावा केला आहे. यानंतर मुंबई उच्च न्यायालयाने तनुश्री दत्ताला ‘नाम’ (Naam) सामाजिक संस्थेविरोधात आरोप लावण्यापासून मज्जाव केला आहे.
काय होते नेमकं प्रकरण?
तनुश्री दत्ताने नाम फाऊंडेशनवर (Naam Foundation) गंभीर आरोप केले होते. फाऊंडेशन आणि शेतकऱ्यांच्या नावाखाली कोट्यावधी रुपये नाना पाटेकर यांच्याकडे आले आहेत. मात्र या पैशांमध्ये भ्रष्टाचार झाला आहे. कोल्हापूर पूरग्रस्तांना 500 घरे देणार होते, त्याचे काय झालं? कोणी जाऊन बघितले?' सोबतच नाना पाटेकर हे दुसरे आसाराम बापू असल्याचेही तिने म्हटले होते.
आपल्या संस्थेची विनाकारण बदनामी केल्याचा आरोप करत नाना पाटेकर यांच्या नाम संस्थेने तनुश्रीविरोधात खटला दाखल केला होता. मात्र, या खटल्याच्या सुनावणीवेळी तनुश्री अनुपस्थित होती. तसेच, तिचे वकीलही वेळेवर न्यायालयात हजर राहिले नाहीत. त्यानंतर न्यायमूर्ती एके मेनन यांनी ‘नाम’ संस्थेला दिलासा दिला. नाना पाटेकर यांच्या 'नाम फाऊंडेशन'कडून कोट्यावधी रुपयांच्या भ्रष्टाचार; तनुश्री दत्ताचा खळबळजनक आरोप
काय होते लैंगिक शोषणाचे प्रकरण?
2009 मध्ये आलेल्या ‘हॉर्न ओके प्लीज’ या हिंदी चित्रपटातील एका गाण्याच्या चित्रिकरणावेळी नाना पाटेकर यांनी आपला विनयभंग केला, असा आरोप तनुश्रीने केला होता. 2018 मध्ये एका वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत तनुश्रीने नाना पाटेवर यांच्यावर विनयभंगांचा आरोप केला होता. हे प्रकारण पोलिसांपर्यंत पोहोचलं होतं. पण सबळ पुरावा नसल्यामुळे नाना यांना क्लीन चिट मिळाली होती.