गेल्या काही दिवसांपासून रानू मंडल हे नाव भारतात प्रचंड लोकप्रिय झाले आहे. एखादी व्यक्ती एका स्टेशनवर लता मंगेशकर यांचे गाणे गाते काय, तिचा व्हिडीओ व्हायरल होतो काय आणि तिला चित्रपटात गाण्याची संधी मिळते काय. अगदी स्वप्नवत वाटणारी ही घटना आहे. रानू मंडल यांना लता मंगेशकर यांच्या 'एक प्यार का नग़मा है' या गाण्याने प्रचंड लोकप्रियता मिळाली. आता रानू यांच्या प्रसिद्धीनंतर स्वतः लता मंगेशकर यांनी या संपूर्ण गोष्टीवर भाष्य केले आहे. ‘माझ्या गाण्यांमुळे कोणाचे भले होत असेल तर त्यात मला आनंदच आहे’ असे लता मंगेशकर म्हणाल्या आहेत.
‘आयएएनएस’शी बोलताना लता मंगेशकर यांनी आपले मत व्यक्त केले. त्या म्हणाल्या, ‘माझ्या गाण्यांमुळे कोणाचे भले होत असेल तर मी नशीबवान आहे. परंतु इतर मोठ्या कलाकारांची गाणी गाऊन तुम्हाला ठराविक काळासाठी प्रसिद्धी मिळाले मात्र त्यात नवनिर्मितिक्षमता नसल्यास ती प्रसिद्धी फार काळ टिकू शकत नाही’.
त्या पुढे म्हणाल्या, ‘अनेक मुले रिअॅलिटी शोमध्ये गातात मात्र सुरुवातीच्या यशानंतर त्यांना कोण लक्षात ठेवतो? सध्या मला फक्त सुनिधी चौहान आणि श्रेया घोषाल हीच नावे माहित आहेत. त्यामुळे इतरांची गाणी जरूर गा मात्र ठराविक वेळानंतर त्यात स्वतःचेही काही द्या. याचे फार मोठे उदाहरण आहे आशा भोसले. आज आशाने स्वतःच्या गाण्यांची वेगळी ओळख निर्माण केली म्हणून ती यशस्वी ठरू शकली, नाही तर माझी सावली म्हणून ती राहिली असती.’ अशा शब्दांत लता मंगेशकर यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. (हेही वाचा: स्टेशनवर 'एक प्यार का नग़मा है' गाणाऱ्या रानू दीला मिळाली रिअॅलिटी शो ची ऑफर; मेकओव्हर झाल्यावर ओळखणे मुश्कील (Video))
दरम्यान, नुकतेच हिमेश रेशमियासोबत रानू मंडल यांनी त्यांचे तिसरे गाणे रेकॉर्ड केले आहेत. यादरम्यान त्यांनी काही रिअॅलिटी शोज मध्येही हजेरी लावली. तसेच त्या काही स्टेज शोजही करण्याचा तयारीत आहेत. रानूदी पतीच्या निधनानंतर रानू स्टेशनवर गाणी गात आपला चरितार्थ चालवत होती. मात्र आता आयुष्याच्या या वळणावर तिचे जीवन पूर्णतः बदलून गेले आहे.