स्टेशनवर 'एक प्यार का नग़मा है' गाणाऱ्या रानू दीला मिळाली रिअ‍ॅलिटी शो ची ऑफर; मेकओव्हर झाल्यावर ओळखणे मुश्कील (Video)
रानू मंडलचा मेकओव्हर (संग्रहित संपादित प्रतिमा)

सोशल मीडिया (Social Media) कल्चर इतक्या मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने असे अनेक लोक आहेत जे रातोरात स्टार बनले. याआधी कुणी विचारही केला नसेल की, आपल्या घरात, चार भिंतींमध्ये स्वतःच्या समाधानासाठी केलेले नृत्य एखाद्या व्यक्तिला तुफान लोकप्रियता मिळवून देईल. असेच काहीसे पश्चिम बंगालच्या रानू मंडलच्या (Ranu Mondal) बाबतीत घडले आहे. स्टेशनवर (Ranaghat Railway Station) भिक मागत गुजराण करणाऱ्या रानूच्या एका गाण्याने तमाम लोकांचे काळीज हेलावून टाकले आणि आज रानूदेखील रातोरात स्टार बनली आहे.

कदाचित तुम्हीही हा व्हिडीओ नक्कीच पहिला असेल. विस्कटलेले केस, चेहऱ्यावर मोजता न येणाऱ्या सुरुकुत्या, आर्थिक परिस्थितीने खंगलेली रानू शोर चित्रपटातील ‘एक प्यार का नग़मा है, मौजों की रवानी है’ (Ek pyaar ka nagma hai) गाणे मोठ्या सुरेल आवाजात गात आहे. या गाण्यामुळे अनेक लोक तिच्या आवाजाचे चाहते झाले. आता तिला कोलकाता, मुंबई, केरळ आणि अगदी बांगलादेशच्या सीमेवरूनही परफॉर्मन्ससाठी विनंत्या येत आहेत. तिला स्वतःचा म्युझिक अल्बम रेकॉर्ड करण्यासाठीही अनेकांनी ऑफर दिली आहे. (हेही वाचा: डोळा मारल्याचा व्हिडिओ पाहून दिग्दर्शकही प्रिया वारियार हिच्या प्रेमात, चित्रपटात दिली प्रमुख भूमिका)

मूळ लता मंगेशकरच्या आवाजातील रानूने गायलेले हे गाणे नक्की तिनेच गायले आहे का? असा प्रश्न निर्माण झाला मात्र कितीही लपवली तरी कला लपत नाही. रानूचा आवाज आज तिची ओळख बनून आपल्या सर्वांच्या समोर आहे. रिपोर्ट्सनुसार, आता रानूला मुंबईत रिअ‍ॅलिटी शोसाठीही बोलविण्यात आले आहे. शोच्या निर्मात्यांनी रानूचा संपूर्ण मेकओव्हर केला आहे. रानूचे आताचे फोटोज पाहून तिला ओळखणेही कठीण झाले आहे. सध्या रानूचा मेकओव्हर सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे. पतीच्या निधनानंतर रानू स्टेशनवर गाणी गात आपला चरितार्थ चालवत होती. मात्र आता आयुष्याच्या या वळणावर तिचे जीवन पूर्णतः बदलून गेले आहे.