६ फेब्रुवारी १९६५, देव आनंदचा मास्टरपीस ‘गाइड’ भारतामध्ये प्रदर्शित झाला. त्याआधी या चित्रपटाची इंग्लिश आवृत्तीही प्रदर्शित झाली होती. होय, या चित्रपटाच्या दोन आवृत्त्या बनल्या होत्या. तर १९६२ मध्ये बर्लिन चित्रपट मोहत्सवासाठी देव साहेब आपला ‘हम दोनो’ घेऊन गेले होते, त्यावेळी देव साहेबांच्या नजरेस ‘गाइड’ हे पुस्तक पडले. या कथेने अतिशय प्रभावीत होऊन भारतात परत आल्यावर लगेच त्यांनी आर.के.नारायण यांना फोन करून या पुस्तकाचे हक्क विकत घेतले. मात्र त्या आधी सत्यजित रे यांना या पुस्तकावर चित्रपट बनवायचा होता, आणि योगायोग म्हणजे रोझीच्या भूमिकेसाठी त्यांनी देखील वहिदाजींचाच विचार केला होता. मात्र देव साहेबांनी या पुस्तकाचे हक्क आधीच विकत घेतल्याने रे साहेबांचा चित्रपट काही बनू शकला नाही.

तर या चित्रपटाची कथा त्याकाळाच्या अगदी १०० पावले पुढे होती. एक लग्न झालेली स्त्री परपुरुषाच्या प्रेमात पडते आणि त्यासाठी आपल्या पतीला सोडते ही त्यावेळेसाठी अगदी बोल्ड कथा होती. देव साहेबांना हा चित्रपट इंग्लिशमध्ये बनवायचा होता मात्र इंग्लिश भाषेतील चित्रपट भारतातील लोक स्वीकारणार नाहीत, म्हणून त्यांनी या चित्रपटाची हिंदीही आवृती बनवली. टेड डॅनीलेवस्की दिग्दर्शित इंग्लिश आवृत्ती त्यांनी अमेरिकेमध्ये पाठवली तर भारतीय लोकांच्या मानसिकतेनुसार काही बदल करून हिंदी आवृत्ती भारतामध्ये प्रदर्शित केली. इंग्लिश गाइड सपाटून आपटला मात्र हिंदी गाइडने विक्रमाचे अनेक उच्चांक मोडले, आज इतक्या दशकांनंतरही त्याची जादू कमी झाली नाही.

हिंदी गाइड आधी चेतन आनंद दिग्दर्शित करणार होते, मात्र रोझीच्या भूमिकेसाठी त्यांना लीला नायडू हव्या होत्या, याला देव साहेबांनी पूर्ण नकार दिला. त्यामुळे चेतन साहेब या चित्रपटामधून बाहेर पडले आणि त्यांनी आपल्या हकीकतची (१९६४) प्रक्रिया सुरु केली. शेवटी देव आनंद यांनी मनधरणी केल्यावर विजय आनंद हा चित्रपट दिग्दर्शित करण्यास तयार झाले. मात्र रोझीच्या भूमिकेसाठी त्यांची पहिली पसंती होती प्रिया राजवंश. त्यांच्यामते प्रिया वहिदापेक्षा जास्त चांगले इंग्लिश बोलू शकते मात्र देव आपल्या निर्णयावर ठाम होते. पुढे या भूमिकेसाठी वैजयंती माला यांचाही विचार झाला मात्र शेवटी रोझीची भूमिका वाहिदाजींच्याच झोळीत पडली आणि त्यांनी त्याचे सोने केले. अतिशय नाट्यमय असलेली ही भूमिका, जिच्या स्वभावाचे अनेक पैलू होते. चेहऱ्यावरील भाव आणि संगीताच्या तालावर थिरकणारे पाय जिचे अस्तित्व होते अशी रोझी वहिदाजींनी अजरामर करून टाकली.

गाइड भारतीय चित्रपटसृष्टीमधील एक सुंदर संगीतमय चित्रपट मानला जातो. चित्रपट आर्थिकदृष्टया खूप यशस्वी आणि एक अनोखा कलात्मक चित्रपट म्हणून गणला गेला. टाइम्स मॅगझीनच्या रेटिंग नुसार हा ४ था सर्वोत्कृष्ट भारतीय कलात्मक चित्रपट ठरला होता.

आजही देव साहेबांचे संवाद, वहिदाजींची अदाकारी, नृत्य, संगीत आपल्या काळजावर राज्य करत आहे. तसूभरही या चित्रपटाची लोकप्रियता कमी झाली नाही. आणि याचे संपूर्ण श्रेय जाते देव आनंद, वहिदा रेहमान, एस.डी.बर्मन, शैलेन्द्र, लता मंगेशकर आणि मोहम्मद रफी यांना. यांमुळेच नवकेतनचा पहिला रंगीत चित्रपट असलेल्या गाइडचे रंग आजही तसेच ताजे आहेत.

गाइड चित्रपटाच्या यशात याच्या कथेसोबतच गाण्यांचेही प्रचंड योगदान आहे. या चित्रपटामधील सर्वच्या सर्व गाणी गाजली. आणि अजूनही ‘लोकप्रिय ५० गीतां’मध्ये गाइडच्या गाण्यांचा समावेश केला जातो. यातल्या प्रत्येक गाण्याशी काही ना काही आठवण जोडली गेली आहे. तर गाइड चित्रपट स्वीकारला आणि बर्मन साहेब आजारी पडले. त्यांनी दुसरा संगीतकार घेण्याची देव साहेबांना विनंती केली, मात्र देव साहेब थांबले आणि शेवटी बर्मन साहेब बरे झाल्यावरच गाण्यांचे काम परत सुरु झाले.

‘आज फिर जिने कि तमन्ना है...’ गाइड चित्रपटाचा जीव की प्राण. मात्र हे गीत जेव्हा तयार झाले त्यावेळी देव साहेबांना हे गीत अजिबात आवडले नव्हते. त्यांनी ते गीत चित्रपटात घेण्यास पूर्णतः नकार दिला, मात्र फक्त बर्मन साहेब आणि विजय आनंद यांच्या सांगण्यावरून त्यांनी ते गीत चित्रित केले आणि या गाण्याने इतिहास घडवला. हे गाणे त्याच्या अंतरामधून सुरु करून बर्मन साहेबांनी एक नवा प्रयोग केला. हे गाणे राजस्थानच्या चित्तोडगढ किल्ल्यामध्ये चित्रित झाले. शूट करण्यासाठी अतिशय अवघड असे हे गाणे होते. वहिदाजींच्या नृत्यांच्या स्टेप्स आणि कॅमेरा एकाचवेळी चालणे हे अवघड होते मात्र जास्त कट्स न घेता अगदी सफाईने हे गाणे चित्रित झाले. या गाण्यात वहिदाची प्रतिमा आरश्यात दिसते अशा एक शॉट आहे. राणी पद्मिनीच्या कथेवरून हा शॉट मुदाम या गाण्यात ठेवला गेला.

गाण्यांच्या गीतकारासंबंधी एक आठवण सांगितली जाते. तर सुरुवातीला गाइडचे गीतकार हसरत जयपुरी साहेब होते. हसरतजींनी ‘दिन ढल जाये...’ गाण्याचा मुखडा लिहिला, मात्र देव साहेबांना तो अजिबात आवडला नाही. त्यांनी हसरत साहेबांना तो मुखडा बदलण्याची विनंती केली मात्र त्यांनी ती मान्य केली नसल्याने हसरत साहेबांना हा चित्रपट सोडवा लागला. आता आली का पंचायत, कारण त्याच्याच दुसऱ्या दिवशी सर्व युनिट आउटडोअर शुटींगसाठी रवाना होणार होते. शेवटी खूप रात्री देव आणि विजय साहेबांनी शैलेन्द्रजींच्या घराचे दरवाजे ठोठवले, आणि तिथे वर्णी लागली शैलेंद्र साहेबांची. शैलेंद्रजींना त्या गाण्याची पहिली ओळ प्रचंड आवडली त्यामुळे त्यांनी ती ओळ तशीच ठेऊन नवे गाणे तयार केले आणि कागद देव साहेबांच्या हाती ठेवला. अशा प्रकारे शैलेद्रजींनी लिहिलेल्या या सर्वच गाण्यांनी अक्षरशः इतिहास घडवला.

‘मोसे छल किये जाये...’ गाणे, हिंदी चित्रपट सृष्टीमधील एक एपिक गाणे म्हणावे लागले. आजही वहिदाचे नृत्य लोकांच्या डोळ्यासमोर तरळत असेल. वेगवेगळ्या प्रकारच्या अनेक वाद्यांचा उपयोग या गाण्यात केला आहे, जणू काही वहिदासोबत ही वाद्येही थिरकत आहेत. त्यातीलच एक म्हणजे तबला. तर हा तबला आहे पं. शिव कुमार शर्मा यांचा. होय तेच प्रसिद्ध संतूर वादक. शर्माजी एक उत्तम तबला वादक होते मात्र त्यांनी तबला त्यागून संतूरकडे आपला मोर्चा वळवला होता. मात्र आर.डी.बर्मन यांनी या गाण्यासाठी त्यांना तबला वाजवायची विनंती केली. फक्त या विनंती खातीर शर्माजी तयार झाले, मात्र त्यांनी गाइड नंतर कधीही कोणत्याही हिंदी गाण्यासाठी तबला वाजवला नाही. म्हणूनच फक्त या तबल्यासाठी हे गाणे एकदा नक्की ऐका. बर्मन साहेबांनी याच धुनेवर आधारीत ‘क्या से क्या हो गया...’ बनवले. ही दोन्ही गाणी विरह गीते होती. त्यामधील सिक्वेंस कायम राहावा म्हणून बर्मनसाहेबांनी एकाच धुनेवर दोन गाणी बनवली मात्र दोन्हींच्या नोट्स इतक्या वेगळ्या ठेवल्या की ऐकताना एकाच धून असल्याचे जाणवत देखील नाही.

‘पिया तोसे नैना लागे रे...’ बर्मन साहेबांचे अजून एक मास्टरपीस. हे गाणे बनवणे, कंपोज करणे प्रचंड अवघड होते. इतक्या मोठ्या लांबीचे गाणे बनवणे हे एक फार मोठे आव्हान होते यासाठीच बर्मन साहेबांनी प्रत्येक कडवे हे एक नवे गाणे आहे असे समजून ते बनवले आणि नंतर सारी कडवी एकत्र जोडली आणि हे गीत तयार झाले. आणि सर्वात मोठे आश्चर्य म्हणजे इतके अवघड गाणे बर्मन साहेबांनी हॉस्पिटलमध्ये बेड झोपून बनवले होते.

‘वहा कौन है तेरा...’ गाण्याची अजून मजा अनुभवायची असेल तर बर्मन साहेबांचेच ‘दूर कोण पोरबाशे...’ हे बंगाली गीत नक्की ऐका. कारण याच मूळ बंगाली गीतावर हे हिंदी गाणे आधारीत आहे.

‘अल्लाह मेघ दे...’ हे गाणे बांग्लादेशी अबास एहमद यांचे मूळ बंगाली गीत. बर्मन साहेबांनी त्याचा खूप कमालीचा उपयोग या चित्रपटासाठी केला आणि नंतर याच गाण्याचा उपयोग शराबी चित्रपटासाठी ‘दे दे प्यार दे...’ च्या रुपात केला गेला. हा चित्रपट अजून एका गोष्टीसाठी खास आहे ते म्हणजे, या चित्रपटातील तब्बल दोन गाण्यांसाठी स्वतः बर्मन साहेबांनी आपल आवाज दिला आहे. ‘वहा कौन है तेरा...’ आणि ‘मेघ दे पाणी दे...’. गाइड नंतर हा योग कधीच जुळून आला नाही.

या चित्रपटाच्या प्रीमियरला झाडून सारी चित्रपटसृष्टी उपस्थित होती मात्र, कोणालाही हा चित्रपट आवडला नव्हता, मात्र चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर लोकांनी हा चित्रपट डोक्यावर घेतला. यातल्या प्रत्येक गीताने लोकांना वेड लावले.

गाइड ही त्या वर्षीची भारताची ऑस्करसाठीची ऑफिशियल एन्ट्री होती. तसेच मानाच्या ‘कान्स मोहत्सवामधील’ कान्स क्लासिकमध्ये दाखवला गेलेला गाइड हा पहिला भारतीय चित्रपट ठरला. चित्रपटाला फिल्मफेअरचे सारे पुरस्कार मिळाले फक्त दोन सोडून, आणि आश्चर्य वाटेल मात्र हे पुरस्कार होते सर्वोत्कृष्ट संगीत आणि गायक यांचा. होय त्यावर्षी संगीताचा फिल्मफेअर मिळाला होता सुरज या चित्रपटाला आणि सर्वोत्कृष्ट आवाज होता ‘बहारो फुल बरसाओ...’ गीतासाठी असलेल्या मोहम्मद रफी यांचा