अमिताभ बच्चन आणि अभिषेक बच्चन यांची कोरोनातून सुटका व्हावी यासाठी उज्जैन येथे पूजेचे आयोजन, पहा फोटो
Amitabh Bachchan Abhishek Bachchan Coronavirus Positive (Photo Credits: Twitter)

बिग बी अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांनी काल आपल्या ट्विटर अकाऊंटवरून आपल्याला कोरोनाची (Coronavirus) लागण झाल्याची माहिती दिली, त्याच पाठोपाठ अभिषेक बच्चन (Abhishek Bachchan) याची कोरोना चाचणी सुद्धा पॉझिटिव्ह आली होती. या दोघांच्याही स्वास्थ्यासाठी सोशल मीडियावरून राजकारणी, कलाकार मंडळी, फॅन्स सर्वांनी सदिच्छा व्यक्त केल्या आहेत. मात्र मध्य प्रदेश मधील बिग बी यांचा फॅन ग्रुप फक्त रिकव्हरी साठी शुभेच्छा देण्यावरच थांबला नाही तर त्यांनी चक्क आपल्या लाडक्या महानायकासाठी चक्क मंदिरात पूजेचे सुद्धा आयोजन केले होते. मध्य प्रदेश (Madhya Pradesh) च्या उज्जैन (Ujjain) येथे एका मंदिरात लोकांनी एकत्र येऊन अमिताभ बच्चन आणि अभिषेकच्या आरोग्यासाठी प्रार्थना करत पूजा केली होती. याचे काही फोटो ANI या वृत्तसंस्थेने शेअर केले आहेत. अमिताभ बच्चन, अभिषेक बच्चन यांना कोविड 19 वर मात करण्यासाठी लता मंगेशकर, माधुरी दीक्षित ते सचिन तेंडुलकर पर्यंत मान्यवरांच्या शुभेच्छा!

ANI ने शेअर केलेल्या फोटोमध्ये तुम्ही पाहू शकता की या पूजेसाठी पुजाऱ्यांनी हातात अभिषेक आणि अमिताभ यांचा फोटो धरून यज्ञ होम हवनासहित अगदी साग्रसंगीत पूजा केली आहे. या फोटोमध्ये बऱ्याच अंशी सोशल डिस्टंसिंग चे तीन तेरा वाजल्याचे स्पष्ट दिसत आहे.

ANI ट्विट

दरम्यान, जुहूच्या नानावटी सुपर स्पेशॅलिटी हॉस्पिटलमध्ये अमिताभ आणि अभिषेक यांना दाखल करण्यात आले आहे. हॉस्पिटलकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, बिग बी आणि अभिषेक बच्चन यांना ताप, खोकला अशी सौम्य लक्षणं आहेत. दोघेही निगराणीखाली असून आता त्यांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा होत आहे. लवकरच कोविड 19 वर ते मात करतील असा विश्वास आहे.