सुपरस्टार रणवीर सिंग (Ranveer Singh) हा भारतीय चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध आणि लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक मानला जातो. रणवीरचे चाहते फक्त भारतामध्येच नाही तर परदेशातही आहेत. आता रणवीरला फिफा विश्वचषक फायनलमध्ये (FIFA World Cup Final) सहभागी होण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे. फिफाने 20 नोव्हेंबरपासून सुरू होणार्या फुटबॉल विश्वचषक स्पर्धेचा अंतिम सामन्यासाठी जगभरातील लोकांना आमंत्रणे पाठवली आहेत. रणवीरला भारताचे प्रतिनिधित्व करण्यासाठी निमंत्रित केले आहे.
फिफा विश्वचषकादरम्यानचे सामने पाहण्यासाठी माजी खेळाडू आणि सेलिब्रिटींना आमंत्रित करते. या फुटबॉल विश्वचषकाचे 22 पर्व कतारमध्ये खेळवले जाणार आहे. या स्पर्धेचा अंतिम सामना 20 डिसेंबर रोजी लुसेल स्टेडियमवर खेळवला जाईल. या सामन्यासाठी रणवीर उपस्थित राहण्याची शक्यता आहे. रणवीर त्याच्या अभिनय आणि शैलीमुळे तरुणाईमध्ये लोकप्रिय आहे. त्याला युथ आयकॉन समजले जाते. आता फिफाला अधिकाधिक तरुणांना विश्वचषकाकडे आकर्षित करायचे आहे, म्हणूनच त्यांनी रणवीरला निमंत्रण पाठवले आहे.
लुसेल स्टेडियमवर फायनलच्या दिवशी रणवीर अनेक दिग्गजांना भेटेल. याआधी रणवीरने अबू धाबी येथे एनबीए गेम्समध्ये देखील भाग घेतला होता, जिथे तो बास्केटबॉल आयकॉन शकील ओ'नील आणि विन्स कार्टरला भेटला होता. आता सुमारे महिनाभर चालणाऱ्या फिफा स्पर्धेत 32 संघ सहभागी होणार आहेत. नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यात पहिल्यांदाच विश्वचषक खेळवला जाणार आहे. आतापर्यंत विश्वचषक जून-जुलैमध्ये होत असे. (हेही वाचा: अभिनेता सलमान खानला आता Y+ सुरक्षा, लॉरेन्स बिश्नोई टोळीच्या धमकी नंतर राज्य सरकारचा निर्णय)
पहिला सामना 60,000 प्रेक्षक क्षमतेच्या अल बायत स्टेडियमवर स्पर्धेचा खेळवला जाईल. स्पर्धेतील सामने आठ मैदानांवर खेळवले जातील. 80,000 प्रेक्षक क्षमतेच्या लुसेल स्टेडियमवर अंतिम सामना होणार आहे. मध्यपूर्वेत होणारा हा पहिलाच विश्वचषक असेल. कतारमध्ये विश्वचषक पाहणाऱ्यांना लसीकरण करणे बंधनकारक नाही. आरोग्य मंत्रालयाने म्हटले होते की, कोविड-19 प्रकरणे पुन्हा सुरू झाल्यास खेळाडू आणि सामना अधिकाऱ्यांना ‘बायो-बबल’ मध्ये राहण्यास भाग पाडले जाऊ शकते. याशिवाय नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना स्पर्धेतून बाहेर काढले जाऊ शकते.