कोरोना विषाणूमुळे (Coronavirus) देशात 21 दिवस लॉकडाउन सुरू आहे. अशावेळी मध्यम वर्गीय आणि उच्च मध्यमवर्गीय लोक आपल्या घरातूनच काम करत आहेत. मात्र या बंदीमुळे मजूर, गरीब-वंचित समाजातील लोकांसमोर मोठी समस्या उद्भवली आहे. अशा लोकांच्या मदतीसाठी सध्या बरेच हात पुढे आले आहेत. या अडचणीच्या काळात सलमान खान (Salman Khan) सुद्धा चित्रपट उद्योगातील 25,000 कामगारांना आर्थिक मदत करण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या या लॉकडाऊनमुळे चित्रपट आणि मालिकांचे शुटींग थांबले आहे त्यामुळे या व्यवसायात काम करणारे कामगार बेरोजगार झाले आहेत.
सलमान खानच्या वतीने, त्याने फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉईज (FWICE) या संस्थेकडून 25000 कामगारांच्या बँक खात्यांची माहिती मागवली आहे, जेणेकरून त्यांना आर्थिक मदत दिली जावी. एफडब्ल्यूईसीचे सरचिटणीस अशोक दुबे यांनी दिलेल्या माहितीनुसार, 'रोजंदारी मजुरांना मदत करण्यासाठी सलमान खान फिल्म्सच्या सीईओ शमीरा नंबियार यांनी काही दिवसांपूर्वी फेडरेशनला बोलावले होते. त्यावेळी २५ हजार कामगारांना मदत करण्याचा निर्णय घेण्यात आला'. सलमान खानची स्वयंसेवी संस्था लोकांना त्यांचे शिक्षण आणि वैद्यकीय गरजांसाठी मदत करते.
(हेही वाचा: अभिनेता अक्षय कुमार याच्याकडून कोरोना व्हायरसच्या पार्श्वभुमीवर PM-Cares Fund साठी 25 कोटींची मदत)
सलमानच्या या निर्णयामुळे वडील सलीम खान देखील आनंदी आहेत. याबाबत बोलताना ते म्हणाले, ‘आपला पैसा कुणाच्यातरी कामी येणे गरजेचे आहे. पैसा जिथे जाओ तिथे तो दिसला पाहिजे. आमचा परिवार नेहमीच इतरांच्या मदतीला धावला आहे, यात मला आनंद आहे’. दरम्यान, लॉकडाऊनमुळे सलमान खानने 'सलमान खान फिल्म्स' आणि 'सलमान खान टीव्ही' च्या सर्व कर्मचार्यांना आगाऊ पगारही दिला आहे. सलमानसोबत अनेक बॉलीवूड कलाकारांनी देशवासीयांसाठी मदत जाहीर केली आहे. नुकतेच अक्षय कुमारनेही 25 कोटी रुपये मदतीची घोषणा केली आहे.