Kangana Ranaut, Dia Mirza,Sanjay Raut (PC - Facebook/Instagram)

Dia Mirza On Sanjay Raut: बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत (Kangana Ranaut) ने मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरसोबत केली होती. कंगनाच्या या वक्तव्यावरून तिच्यावर प्रचंड टीका करण्यात आली. शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी कंगनाला खडेबोल सुनावले. तसेच कंगनाने महाराष्ट्रातील जनतेची आणि मुंबईची माफी मागावी, अशी मागणीदेखील संजय राऊत यांनी केली. मात्र, कंगनाला 'हरामखोर मुलगी' म्हटल्याप्रकरणी संजय राऊत यांनी तिची माफी मागावी, अशी मागणी बॉलिवूड अभिनेत्री दिया मिर्झा (Dia Mirza) ने केली आहे.

दियाने आपल्या ट्विटर अकाऊंटवरून यासंदर्भात एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तिने म्हटलं आहे की, 'संजय राऊत यांनी हरामखोर हा अत्यंत चुकीचा शब्दप्रयोग केला आहे. सर, कंगनाने जे वक्तव्य केलं, त्यावर नाराजी व्यक्त करण्याचा किंवा त्यावर मत मांडण्याचा तुम्हाला पूर्ण अधिकार आहे. परंतु, अशी भाषा वापरल्याप्रकरणी तुम्ही कंगनाची माफी मागावी.' (हेही वाचा -Sanjay Raut On Kangana Ranaut: कंगना रणौतने महाराष्ट्राची माफी मागितली तर मी विचार करील - संजय राऊत)

कंगनाने मुंबईची तुलना पाकव्याक्त काश्मीरशी केल्याने संपूर्ण देशातील वातावरण तापलं आहे. तिच्या वक्तव्याचा अनेकांनी निषेध केला असून तिच्यावर अत्यंत कठोर शब्दांत टीका करण्यात आली आहे. या सर्व प्रकारानंतरदेखील कंगनाने येत्या 9 सप्टेंबर मुंबईत येत असल्याचं सांगत कोणाच्या बापाची हिंमत असेल तर, रोखून दाखवा, असा इशारा दिला आहे.

दरम्यान, आज संजय राऊत यांनी कंगनाने महाराष्ट्राची आणि मुंबईची माफी मागितली तर, मी विचार करेल, असं म्हटलं आहे. तसेच आपल्या ट्विटरवरून कंगनावर अप्रत्यक्ष टीका करताना 'मेरी हिम्मत को परखने की गुस्ताखी न करना, पहले भी कई तूफानों का रुख मोड चुका हूँ,' असं म्हटलं आहे.