पठान या चित्रपटातील दीपिका पदुकोणच्या भगव्या रंगाच्या बिकिनीमुळे देशात मोठा वाद निर्माण झाला होता. आता बॉलीवूड चित्रपट, मालिका आणि ओटीटी (OTT) प्लॅटफॉर्मवर सनातन धर्माचा अपमान करणारा कंटेंट रोखण्यासाठी ज्योतिषपीठाचे शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी धर्म सेन्सॉर बोर्डाची (Dharma Censor Board) स्थापना केली आहे. प्रयागराज माघ मेळ्यात त्यांनी गुरुवारी धर्म सेन्सॉर बोर्डाची मार्गदर्शक तत्त्वेही जारी केली.
ही मार्गदर्शक तत्त्वे लवकरच निर्माते-दिग्दर्शकांना पाठवली जातील, असे शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी सांगितले. त्यानंतर बॉलिवूड चित्रपट, मालिका आणि ओटीटी प्लॅटफॉर्मवर सनातन धर्माचा अपमान करणाऱ्या कंटेंटवर बारीक नजर ठेवली जाईल. ते म्हणाले की, बोर्ड सदस्य प्रदर्शित होणाऱ्या चित्रपटाचा पहिला शो पाहतील. 25 जानेवारी रोजी प्रदर्शित होणारा शाहरुख खानचा पठाण चित्रपटही बोर्डाचे सदस्य पहाणर आहेत आणि त्यामध्ये काही आक्षेपार्ह मजकूर आढळल्यास, धर्म सेन्सॉर बोर्ड तो भाग काढून टाकण्याची मागणी करेल.
ज्योतिष पीठाचे शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी धर्म सेन्सॉर बोर्ड झोंको, टोको आणि रोकोच्या शैलीने काम करेल, असे म्हटले आहे. मंडळाच्या सदस्यांनी चित्रपट पाहिल्यानंतर प्रमाणपत्रही दिले जाईल, असे त्यांनी सांगितले. जुने चित्रपटही धर्म सेन्सॉर बोर्ड पाहतील आणि त्यांनाही प्रमाणपत्र दिले जाईल, असेही ते म्हणाले. (हेही वाचा: Pathaan Advance Booking: 'पठाण'चे अॅडव्हान्स बुकिंग सुरू; रिलीजपूर्वी 5 लाख तिकिटांची विक्री)
ज्योतिषपीठाचे शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती हे स्वतः धर्म सेन्सॉर बोर्डाचे संरक्षक आहेत. धर्म सेन्सॉर बोर्डामध्ये एका प्रमुख सदस्यासह विविध क्षेत्रातील एकूण नऊ सदस्यांचा समावेश आहे. यामध्ये सुरेश मनचंदा यांची प्रमुख सदस्य म्हणून निवड करण्यात आली आहे. तर डॉ.पी.एन.मिश्रा, स्वामी चक्रपाणी महाराज, मानसी पांडे, तरुण राठी, कॅप्टन अरविंद सिंह भदोरिया, प्रीती शुक्ला, डॉ.गार्गी पंडित, डॉ.धरमवीर यांना सदस्य करण्यात आले आहे.