"बेकायदा बांधकाम असेल तर कारवाई केलीच पाहिजे. कोणीतरी तुमच्याविरूद्ध बोलले, म्हणून जर तुम्ही कारवाई केली तर तो भ्याडपणा आहे. सूडबुद्धीची भावना आहे आणि याचा महाराष्ट्रात सन्मान होणार नाही," असे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी म्हटले आहे. अभिनेत्री कंगना रनौत ((Kangana Ranaut) हिच्या मुंबईतील बंगल्यानजीकच्या अवैध बांधकामावर बीएमसीच्या (BMC) अधिकाऱ्यांकडून करण्यात आलेल्या तोडकामावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आपली प्रतिक्रिया नोंदवली आहे. आपल्या विरोधात कोणी बोलले म्हणून ही कारवाई केली असेल तर हा भ्याडपणा आहे. या सुडबुद्धीचा महाराष्ट्र सन्मान होणार नाही, अशा शब्दांत फडणवीस यांनी आपले मत स्पष्ट केले आहे.
अभिनेत्री कंगना रनौत आणि शिवसेना पक्ष यातील वाद आता शिगेला पोहचला आहे. पाकव्याप्त काश्मीर सोबत मुंबईची तुलना करणाऱ्या कंगना रनौत हिला मुंबई महानगरपालिकेने चांगलाच दणका दिला आहे. मुंबईतील तिच्या बंगल्यानजीकच्या अवैध बांधकामावर बीएमसीच्या अधिकाऱ्यांकडून तोडक कारवाई करण्यात आली. तसंच तिच्या वांद्रे येथील मणिकर्णिका कार्यालयातीही तोडफोड करण्यात आली. (Kangana Ranaut Office Demolition: हा लोकशाहीचा मृत्यु म्हणत कंंगना रनौत ने शेअर केले तोडफोड झालेल्या ऑफिस मधील Video, इथे पाहा)
ANI HindiNews Tweet:
अगर अवैध कंस्ट्रक्शन है तो जरूर कार्रवाई होनी चाहिए। किसी ने आपके खिलाफ बात कही इसलिए अगर आप तब कार्रवाई करते हो तो ये कायरता है बदले की भावना है और महाराष्ट्र में इस तरह की भावना का कोई सम्मान नहीं हो सकता : कंगना के ऑफिस पर BMC की कार्रवाई पर महाराष्ट्र पूर्व CM देवेंद्र फडणवीस pic.twitter.com/KpFcE0LFL7
— ANI_HindiNews (@AHindinews) September 9, 2020
कंगना रनौत हिने बंगला, ऑफिसमध्ये बीएमसीकडून करण्यात आलेल्या तोडफोडीचे व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केले आहेत. तसंच तिने एका व्हिडिओत 'पाकिस्तान' असे देखील म्हटले आहे. या प्रकरणी कंगना हिने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. यावर कंगना रनौत हिच्या ऑफिसवर करण्यात आलेल्या कारवाईचे मुंबई महानगरपालिकेने उत्तर द्यावे असे मुंबई उच्च न्यायालयाने म्हटले आहे.
कंगना रनौत हिने मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी केल्यामुळे शिवसेने विरुद्धचा वाद अधिक पेटला. तसंच तिने संबंध महाराष्ट्राची माफी मागावी, असेही शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मागणी केली होती. दरम्यान कंगना रनौत हिच्या या ट्विटनंतर सर्वच स्तरातून तिच्यावर टीकेची झोड उठली होती.