कोरोना रुग्ण, डॉक्टर्स यांना मिळणाऱ्या गैरवर्तणूकीवर अनुष्का शर्मा, अजय देवगण यांनी उठवला आवाज; ट्विटच्या माध्यमातून व्यक्त केल्या भावना
Anushka Sharma (Photo Credits: Instagram/Twitter)

जगभरात हाहाकार घालणारा कोरोना व्हायरस भारतात दाखल झाला आणि हळूहळू त्याने आपली व्याप्ती वाढवायला सुरुवात केली. भारत देशात तब्बल 9152 नागरिक कोरोनाच्या विखळ्यात अडकले आहेत. मात्र परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी केंद्र सरकारसह राज्य सरकारही प्रयत्नशील आहे. तसंच कोरोना संकटाच्या या कठीण परिस्थितीत आपल्या सेवेसाठी डॉक्टर, नर्सेस इतर वैद्यकीय कर्मचारी तत्पर आहेत. मात्र त्यांच्यावर हल्ले केल्याच्या अनेक बातम्या समोर येत आहेत. या घटनांचा राग, चीड, संताप, दुःख तुम्हाला वाटते. त्याचप्रमाणे सेलिब्रेटींनाही या घटना अस्वस्थ करत आहेत. बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा (Anushka Sharma) आणि अजय देवगण (Ajay Devgn) यांनी याबद्दलच्या आपल्या भावना ट्विटच्या माध्यमातून व्यक्त केल्या आहेत.

अनुष्का शर्माने आपल्या ट्विटमध्ये लिहिले की, "कोरोना रुग्णांची सेवा करणारे डॉक्टर्स आणि कोरोना रुग्ण यांना मिळणारी वेगळी वागणूक या संदर्भातील बातम्या काहीशा अस्वस्थ करणाऱ्या आहेत. ही वेळ एकमेकांची काळजी घेण्याची आहे. कोरोना रुग्णांप्रती आपण संवेदशील असायला हवं. त्यामुळे कोरोना रुग्णांना वेगळी वागणूक देऊ नका. ही वेळ एकत्रितपणे उभं राहण्याची आहे." (मुंबई पोलिसांच्या भावनिक व्हिडिओ ला पाठिंबा दर्शवत अजय देवगण आणि आलिया भट यांनी आपल्या फिल्मी अंदाजात दिला जनतेला मोलाचा संदेश)

अनुष्का शर्मा ट्विट:

"सुशिक्षित लोक डॉक्टरांवर हल्ले करतात हे खूप संतापजनक आहे. अशी असंवेदनशील माणसेच वाईट गुन्हेगार असतात," असे संतप्त ट्विट अजय देवगण याने केले आहे.

अजय देवगण ट्विट:

कोरोना व्हायरस संकटात आपल्या सुरक्षेसाठी पोलिस अहोरात्र मेहनत घेत आहेत. तर डॉक्टर्स रुग्णसेवेसाठी तत्पर आहेत. अशा गंभीर परिस्थितीत त्यांच्या बद्दल कृतज्ञता बाळगणारा एक वर्ग दिसून येतो. तर त्यांच्यावर हल्ले करणारे लोकही आढळून येतात. मात्र ही परिस्थिती एकमेकांवर हल्ले करण्याची नाही तर एकत्रितपणे कोरोना विरुद्ध लढा देण्याची आहे.