भारतीय चित्रपटसृष्टीचे महानायक म्हणून अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांच्याकडे पाहिले जाते. 1970 च्या दशकात शिगेला पोहोचलेली त्यांची लोकप्रियता अजूनही टिकून आहे. आतापर्यंत गेले 48 वर्षे सातत्याने नवनवीन भूमिकांमधून आपले मनोरंजन केले आहे. चित्रपटसृष्टीमधील या महान व्यक्तिमत्वाचा आज वाढदिवस. 11 ऑक्टोबर 1948 साली उत्तर प्रदेशच्या प्रयागराज म्हणजे पूर्वीचे अलाहाबाद या ठिकाणी त्यांचा जन्म झाला. 1969 साली ‘सात हिंदुस्तानी’ मधून त्यांनी बॉलिवूडमध्ये पाय ठवला. गेल्या पाच दशकांमध्ये त्यांनी जवळजवळ सव्वादोनशे चित्रपटांमध्ये काम केले आहे. करियरच्या सुरुवातीला भुवन सोम, आनंद, रेश्मा और शेरा, बावर्ची या चित्रपटांनी त्यांना ओळख दिली. मात्र त्यांच्या करियरला कलाटणी मिळाली ती ‘जंजीर’मुळे. त्यानंतर त्यांनी कधीच मागे वळून पाहिले नाही. आज त्यांच्या जन्मदिनी चला पाहूया अमिताभ बच्चन यांच्या कारकीर्दीमधील असे काही चित्रपट ज्यांनी त्यांना बनवले ‘महानायक’.
> जंजीर (Zanjeer)- प्रकाश मेहराचा 'जंजीर' हा चित्रपट 1973 मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात अमिताभ बच्चन यांच्यासोबत जया बच्चन मुख्य भूमिकेत होत्या. या चित्रपटात अमिताभ बच्चन यांनी पोलिस इन्स्पेक्टरची भूमिका साकारली होती. याच चित्रपटामुळे अमिताभ रातोरात स्टार झाले होते.
> डॉन (Don) - 1978 सालचा हा हिंदी क्राइम थ्रिलर चित्रपट आहे. सलीम-जावेद यांनी लिहिलेला हा चित्रपट नरिमन इराणी निर्मित असून, चंद्र बरोट दिग्दर्शित आहे. या चित्रपटात अमिताभ बच्चन, झीनत अमान, इफ्तेखार, प्राण, हेलन, ओम शिवपुरी, सत्येन कप्पू आणि पिंचू कपूर यांनी मुख्य भूमिका साकारल्या आहेत. कल्याणजी आनंदजी यांनी या चित्रपटाचे संगीत दिले असून गाण्याचे बोल अंजन आणि इंदिवार यांनी लिहिले आहेत.
> दीवार (Deewaar) - दीवार हा 1975 मधील अमिताभ बच्चन यांच्या करियर मधील एक महत्वाचा चित्रपट होय. यश चोप्रा निर्मित हा चित्रपट, हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वात यशस्वी चित्रपटांपैकी एक आहे. याच चित्रपटामुळे अमिताभ यांना ‘अॅंग्री यंग मॅन’ हा किताब मिळाला. या चित्रपटाने अमिताभच्या कारकीर्दीला नवीन उंचीवर नेले होते. या चित्रपटाची कहाणी अंडरवर्ल्ड डॉन हाजी मस्तानच्या जीवनावर आधारित असल्याचे म्हटले जाते आणि अमिताभ बच्चन यांनी तीच भूमिका साकारली आहे. (हेही वाचा: अमिताभ बच्चन यांचा फोटो पाहून पळून गेली होती रेखा; बिग बी यांच्या वाढदिवशी पुन्हा झाला व्हिडीओ व्हायरल (Watch Video))
> शोले (Sholay) – हा 1975 मधील भारतीय हिंदी अॅक्शन चित्रपट आहे. सलीम-जावेद यांनी लिहिलेल्या या चित्रपटाची निर्मिती गोपाळ दास सिप्पी यांनी केली असून, दिग्दर्शन त्यांचा मुलगा रमेश सिप्पी यांनी केले आहे. जय (अमिताभ बच्चन) आणि वीरू (धर्मेंद्र) या दोन गुन्हेगारांवर हा चित्रपट आधारित आहे. या चित्रपटात हेमा मालिनी आणि जया बच्चन यांनी मुख्य भूमिका निभावली आहे. शोले हा भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वोत्कृष्ट चित्रपटांपैकी एक मानला जातो. 2002 च्या '10 बेस्ट इंडियन फिल्म्स' च्या सर्वेक्षणात हां चित्रपट प्रथम स्थानवर होता. 2005 मध्ये पन्नासाव्या फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्यातही हा पन्नास वर्षातील सर्वोत्कृष्ट चित्रपट ठरला होता.
> ब्लॅक (Black) – 2005 साली प्रदर्शित झालेला हा चित्रपट संजय लीला भन्साळी यांनी दिग्दर्शित केला होता. अमिताभ बच्चन आणि राणी मुखर्जी यांनी यामध्ये मुख्य भूमिका साकारल्या होत्या. या चित्रपटासाठी अमिताभ आणि राणी या दोघांनाही सर्वोत्कृष्ट अभिनयाचा फिल्मफेअर मिळाला होता. भन्साळी यांच्याही कारकीर्दीमधील हा सर्वित्कृष्ट चित्रपटांपैकी एक आहे.
दरम्यान, अमिताभ यांनी आपल्या कारकीर्दीत अनेक पुरस्कार प्राप्त केले आहेत. यामध्ये दादासाहेब फाळके पुरस्कार, तीन राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार आणि बारा फिल्मफेअर पुरस्कारांचा समावेश आहे. सर्वोत्कृष्ट अभिनेता फिल्मफेअर पुरस्काराचा विक्रम त्याच्या नावावर आहे. अभिनय व्यतिरिक्त बच्चन यांनीपार्श्वगायक, चित्रपट निर्माता, टीव्ही प्रस्तुतकर्ता आणि 1984 ते 1987 दरम्यान भारतीय संसदेचे निवडलेले सदस्य म्हणून भूमिका निभावली आहेत. सध्या ते लोकप्रिय टीव्ही शो ‘कौन बनेगा करोडपती’चे सूत्रसंचालन ते करत आहेत.