83 vs Pushpa: आता छोट्या पडद्यावरही Ranveer Singh आणि Allu Arjun आमने-सामने; एकाच दिवशी, एकाच वेळी 'पुष्पा आणि '83' चा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर
83 vs Pushpa (संग्रहित संपादित प्रतिमा)

बॉलीवूडचा सुपर एनर्जेटिक स्टार रणवीर सिंग (Ranveer Singh) आणि साऊथ सिनेमाचा ब्लॉकबस्टर हिरो अल्लू अर्जुन (Allu Arjun) यांच्यात एकाच तारखेला आणि एकाच वेळी टक्कर होणार आहे. याआधी मोठ्या पडद्यावर ‘पुष्पा’ आणि ‘83’ द्वारे हे दोन्ही अभिनेते एकमेकांच्या समोर आले होते. आता पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर या दोघांमध्ये भिडत होणार आहे. मोठ्या पडद्यानंतर आता पहिल्यांदाच हे दोन्ही चित्रपट एकाच दिवशी आणि एकाच वेळी छोट्या पडद्यावर दाखवण्यात येणार आहेत.

20 मार्च रोजी रात्री 8 वाजता स्टार गोल्डवर ‘83’ चा, तर त्याच दिवशी, त्याचवेळी ढिंचक टीव्हीवर 'पुष्पा' चित्रपटाचा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर होणार आहे. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये एकाच आठवड्यात मोठ्या पडद्यावर प्रदर्शित झालेल्या पुष्पा आणि 83 चित्रपटांनी थिएटरमध्ये आपली जादू दाखवली. आधी 83 प्रदर्शित झाला व त्यानंतर ‘पुष्पा’ आला. 83 कडून अभिनेते, दिग्दर्शक, निर्माते यांना खूप अपेक्षा होत्या. मात्र पुष्पामुळे 83 ची जादू थोडी कमी झाली. अहवालानुसार, काही ठिकाणी ‘83’ च्या स्क्रीन्स काढून घेण्यात आल्या.

प्रेक्षकांनी जरी या चित्रपटाकडे पाठ फिरवली असली तरी, समीक्षकांना हा चित्रपट खूप आवडला. दोन्ही चित्रपट वेगवेगळ्या जॉनरचे होते परंतु तरी त्यांच्यामध्ये काट्याची टक्कर होती. आता दोन्ही चित्रपट एकाच दिवशी, एकाच वेळी टेलिव्हिजनवर येत आहेत. आयपीएलमुळे पुष्पा एक आठवडा आधी टीव्हीवर दाखवला जाणार आहे. याआधीही हा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित झाला आहे. (हेही वाचा: Runway 34 Teaser: अमिताभ, अजय आणि रकुल प्रीतच्या 'रनवे 34' चित्रपटाचा टीझर प्रदर्शित)

कबीर खान दिग्दर्शित 83 हा चित्रपट थिएटरमध्ये रिलीज झाल्यानंतर पहिल्यांदाच टेलिव्हिजनवर दाखवला जाणार आहे. जेव्हा 83 प्रदर्शित झाला तेव्हा अनेक ठिकाणी चित्रपटगृहे बंद होती, त्यामुळे क्रिकेटप्रेमींना हा चित्रपट पाहता आला नाही. आता टेलिव्हिजनवर चित्रपटाच्या प्रीमियरच्या निमित्ताने याचा आनंद घेतला जाऊ शकतो.