![](https://mrst1.latestly.com/wp-content/uploads/2019/12/2019-12-14-1-380x214.jpg)
बॉलिवूड अभिनेता सलमान खान (Salman Khan) याच्या वांद्रे येथील घरी बॉम्ब लपवण्यात आल्याची खोटी माहिती एका 16 वर्षीय मुलाने पोलिसांना दिली होती. त्यामुळे या मुलाविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. उत्तर प्रदेश गाझियाबाद इथे राहणाऱ्या अल्पवयीन मुलाने पोलिसांना मेल करून ही खोटी माहिती दिली होती.या मेलमध्ये सलमानच्या वांद्रे येथील घरात बॉम्ब लावण्यात आला आहे. या बॉम्बचा 2 तासांत स्फोट होणार असून हा स्फोट थांबवण्यासाठी लवकरात-लवकर हालचाल करा, असं लिहिण्यात आलं होतं. मुंबई पोलिसांना 4 डिसेंबरला यासंदर्भात मेल आला होता, असे वृत्त हिंदुस्तान टाइम्सने दिले आहे. (हेही वाचा - Watch Video: सलमान खान ने शेअर केला Dabangg 3 मधल्या ऍक्शन सीन चा धमाकेदार व्हिडिओ)
या मेलमुळे पोलिसांत एकच खळबळ उडाली. पोलिसांनी बॉम्बशोधक पथकासह तात्काळ सलमानच्या 'गॅलेक्सी' (Galaxy) या घराकडे धाव घेतली. यावेळी सलमान त्याच्या घरी नव्हता. परंतु, यावेळी सलमान खानचे आई-वडील आणि बहिणी गॅलक्सीमध्ये होते. त्यांनी ताबडतोप या सर्वांना सुरक्षित ठिकाणी हलविले. त्यानंतर बॉम्बशोधक पथकाने गॅलक्सीमध्ये 4 तास शोध घेतला.
दरम्यान, वांद्रे पोलिस स्थानकातील एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, 'आम्ही सलमानच्या घरासह इमारतीचा प्रत्येक कानाकोपऱ्याचा तपास केला. परंतु, कोठेही बॉम्ब आढळला नाही. त्यानंतर आम्ही सलमानच्या कुटुंबियांना पुन्हा गॅलेक्सी येथील निवासस्थानी आणलं.' या मुलाने याअगोदरही जानेवारी महिन्यात गाझियाबाद पोलिसांना स्थानकात खोटा मेल पाठवला होता. पोलिसांनी खोटा मेल पाठवणाऱ्या 16 वर्षीय मुलाला ताब्यात घेतले आहे.