(संपादित आणि प्रतिकात्मक प्रतिमा)

कार घ्यायचीय! ओके. चला, आली लहर केला कहर... गेले शोरुमला किंवा गाठला एखादा डिलर आणि आणली कार घरी, असं कधीच होत नसंत. कार घेण्यापूर्वी काही दिवस आपण विचार करतो. कार कोणती घ्यायची. मग तिचे मॉडेल, रंग, बजेट आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे कर्जाचा हाप्ता किती पडेल. अर्थातच बजेट. या सर्व गोष्टी निकाली निघाल्या मगच आपण खरेदी करतो ती आपली स्वप्नवत कार. स्वप्न पूर्ण झाल्याच्या आनंदात लगेच आपण मिठाईही वाटतो. आपलं कसं एकदम झटपट असतं, नाही का? पण सावधान....! तुम्ही बरीच घाई करत आहात... कार आवश्य घ्या. पण, त्यापूर्वी काही गोष्टींचा जरुर विचार करा. मग नंतर त्रास होणार नाही..

टेस्ट ड्राईव्ह महत्त्वाची..

कार खरेदी करण्याचा निर्णय घेतलाच आहे. तर, डील फायनल करण्यापूर्वी टेस्ट ड्राईव्ह जरुर घ्या. लक्षात ठेवा टेस्ट ड्राईव्ह त्याच कारची घ्या जी, तुम्हाला विकत घ्यायची आहे. त्या कारच्या फिचर्सवरही आगोदरच रिसर्च करा. तुम्हाला ब्राऊशर किंवा सेल्सपर्सनने जी फिचर्स सांगितली आहेत. कंपनीने ज्या फिचर्सचा दावा केला आहे ती, सर्व फिचर्स कारमध्ये आहेत का हे तपासा...

किंमत ठरवा

तुम्हाला कार खरेदीची किंमत सांगितली आहे. कारची किंमत म्हणून एक ठरावीक रक्कमही निश्चित झाली आहे. मात्र, त्यानंतर सेल्सपर्सन जर इतर कर, किंवा चार्जच्या नावाखाली गाडीची किंमत वाढवत असेल तर, दबावाला बळी पडू नका. तुम्हाला दुसरीकडेही कार मिळू शकते. ठरलेल्या किंमतीवर आडून राहा. अगदी कार घेण्याचा निर्णय पुढे ढकलावा लागत असला तरी. कारच्या किमतीबाबत कोट्स घ्या. इंटरनेट आणि ऑटो क्षेत्रातील अभ्यासकांकडून कारची मुळी किंमत तपासा. मगच व्यवहार नक्की करा. (हेसुद्धा वाचा,भारतात लोकप्रिय असलेल्या लो बजेट टॉप 5 रेसिंग बाईक्स)

स्पष्ट बोला

कार खरेदी करायला जाण्यापूर्वी प्रथम रिसर्च करा. तुम्ही जेव्हा सेल्समनशी बोलाल तेव्हा त्यालाही वाटले पाहीजे की, तुम्ही अभ्यासू आहात. कारच्या फिचर्स आणि इतर बाबींबात तुम्हाला बरीच माहिती आहे. त्यामुळे तुमचा प्रभाव त्याच्यावर पडेल आणि तुम्ही फसले जाण्याची शक्यता कमी होईल. गाडी, मॉडेल, फिचर्स, रंग, किंमत, खरेदीनंतर शोरुम आणि कंपनीकडून मिळणारी सेवा, त्याला लागणारे शुल्क (चार्ज) आदी गोष्टी स्पष्टपणे बोलून घ्या. कार खरेदी केल्यानंतर त्या गोष्टी फायदेशीर ठरतात.

अॅक्सेसरीजच्या मोहाला आळा घाला..

कार खरेदी करण्यापूर्वी आगोदर तुमचे बजेट ठरवा. ते फायनल झाले की मगच कार खरेदी करा. कार खरेदी करताना अनेकदा शोरुम, कंपनीकडून इतर अॅक्सेसरीज देण्याचे आमिश दाखवले जाते. तुम्हाला हव्या असतील तर, अॅक्सेसरीज जरुर घ्या. पण, त्यामुळे तुमचे बजेट वाढणार नाही याकडेही लक्ष द्या. नाहीतर अॅक्सेसरीजच्या मोहापाई कार खरेदीचे बजेट वाढल्याचीही उदाहरणे पहायला मिळतात. कार खरेदी करताना आपण भावनेच्या भरात अॅक्सेसरीज खरेदी करतो. (अनेकदा ती माथी मारली जातात) पण त्यामुळे बजेट वाढून कर्जाचा हाप्ताही वाढतो. त्यामुळे महिन्याचे बजेट कोलमडू शकते.

आर्थिक सावधगिरी बाळगा

कार खरेदी करताना आर्थिक सावधगिरी महत्त्वाची. क्रेडीट कार्ड, लोन, फायनान्स किंवा रोख रक्कम देऊन कार घेताना सर्व कायदेशीर बाबी तपासा. तुमच्या कागदपत्रांचा वापर योग्य झाला आहे की नाही. तुमच्या मुळ कागदपत्रांवर काही गडबड तर नाही ना झाली. लोन योग्य व्यक्तिच्या नाववर आणि तुम्हाला सांगितलेल्याच बँकेचे आहे काय यासारख्या सर्व गोष्टी तपासा.