Image Used for Representational Purpose Only | (Photo Credits: PTI)

वाहनामधून बाहेर पडणाऱ्या धुराने जगातील प्रदुषणामध्ये (Pollution) मोठी भर घातली आहे. सध्या जवळजवळ प्रत्येक देश याचे परिणाम भोगत आहेत. प्रदुषणावर मात करण्यासाठी सध्या इलेक्ट्रिक वाहनांना (Electric Vehicles) प्राधान्य दिले जात आहे. अशात जगातील 6 मोठ्या वाहन निर्माता कंपन्यांनी एक मोठा निर्णय घेतला आहे. ब्रिटन ग्लासगो येथे UN क्लायमेट समिटचे आयोजन करत आहे, ज्याला COP26 Climate Summit असे नाव देण्यात आले आहे. यामध्ये जगातील सर्वात मोठ्या वाहन उत्पादक कंपन्यांपैकी 6 कंपन्यांनी 2040 पर्यंत पेट्रोल आणि डिझेलवर चालणाऱ्या वाहनांचे (Gasoline and Diesel-Powered Vehicles) उत्पादन बंद करण्याचे मान्य केले आहे.

जगभरात कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी अनेक प्रयत्न केले जात आहेत. या जागतिक प्रयत्नांमध्ये सहा मोठ्या कार कंपन्यांनी सकारात्मक पुढाकार घेतला आहे. हे कार निर्माते पेट्रोल डिझेलवर चालणाऱ्या वाहनांचे उत्पादन बंद करणार आहेत. या सहा कंपन्यांपैकी एक कंपनी टाटा समूहाच्या मालकीची आहे. रॉयटर्सच्या वृत्तानुसार, स्वीडनची व्हॉल्वो, अमेरिकन ऑटोमेकर फोर्ड, जनरल मोटर्स डेमलर एजीची मर्सिडीज बेंझ, चीनची बीवायडी आणि टाटा मोटर्सची जॅग्वार लँड रोव्हर (जेएलआर) ग्लासगोमध्ये प्रतिज्ञापत्रावर स्वाक्षरी करणार आहेत.

21 व्या शतकाच्या मध्यापर्यंत जागतिक तापमानवाढ नियंत्रित करण्याच्या मोहिमेचा महत्त्वाचा भाग बनणे हा या प्रतिज्ञाचा उद्देश आहे. यानंतर या कंपन्या 2040 पर्यंत जीवाश्म इंधनावर चालणाऱ्या वाहनांचे उत्पादन पूर्णपणे बंद करतील. या मोहिमेचा उद्देश इलेक्ट्रिक कार वापरणे आणि शून्य उत्सर्जन असलेल्या इतर वाहनांना प्रोत्साहन देणे हे आहे. (हेही वाचा: Electric Vehicle साठी REVOS चे BOLT चार्जिंग पॉईंट भारतात लॉन्च; ऑफर अंतर्गत 1 रुपयांच्या किंमतीत उपलब्ध)

यासह, 250 हून अधिक देश, शहरे आणि कंपन्यांनी 2035 पर्यंत गॅसोलीन आणि डिझेल-चालित वाहनांची विक्री समाप्त करण्यासाठी काम करण्यासाठी संयुक्त राष्ट्रांच्या हवामान प्रतिज्ञावर स्वाक्षरी केली आहे. स्वाक्षरी न करणाऱ्यांच्या यादीत जपानची होंडा, निसान, जर्मनीची बीएमडब्ल्यू, जगातील चौथी सर्वात मोठी कार निर्माता कंपनी स्टेलांटिस आणि दक्षिण कोरियाची ह्युंदाई यांचा समावेश आहे.