Anti Puncture Solution: टायर पंक्चरवर नवा उपाय; एकदा हे लिक्विड भरल्यास आयुष्यभर 'नो टेन्शन'; जाणून घ्या फायदे आणि तोटे
प्रातिनिधिक प्रतिमा (संग्रहित संपादित प्रतिमा)

गाडी चालवणाऱ्या लोकांना नेहमीच टायर पंक्चर (Puncture) होण्याची किंवा टायरची हवा कमी होण्याची भीती असते. यासाठी लांबच्या प्रवासाला जात असताना हमखास ज्यादा स्टेपनी ठेवली जाते. सध्या बाजारात ट्यूबलेस टायर्स (Tubeless Tire) आलेले आहेत, ज्यामुळे टायर पंक्चर होण्याचा धोका नसतो. तसेच काही दिवसांपूर्वी एका कंपनीने एयरलेस व्हील सादर केले आहे. मात्र भारतात ते तंत्रज्ञान वापरले जात नाही. अशा परिस्थितीमध्ये पंक्चरवर उपाय म्हणून काही ठिकाणी अँटीपंक्चर सोल्यूशन (Anti Puncture Solution) चा वापर सर्रास केला जात असलेला दिसत आहे. या सोल्युशनचे काही फायदे आहेत तसे काही तोटेही आहेत. त्यामुळे तुम्ही जर का आपल्या गाडीमध्ये अँटीपंक्चर सोल्यूशनचा वापर करत असाल तर हा लेख वाचायलाच हवा.

अँटीपंक्चर सोल्यूशन काय आहे ?

हे एक असे द्रव आहे जे एकदाका गाडीच्या टायरमध्ये सोडले असता, त्यानंतर त्या टायरमध्ये कोणतीही टोकदार वस्तू घुसल्यास टायर पंक्चर होणार नाही. टायरमध्ये निर्माण होणारा खड्डा किंवा पोकळी हे लिक्विड भरून काढते. महत्वाचे म्हणजे एकदा हे द्रव टायरमध्ये भरल्यास टायर फुटूपर्यंत ते पंक्चर होत नाही.

अँटीपंक्चर सोल्यूशनचे फायदे -

  • अँटीपंक्चर सोल्यूशनचा वापर तुम्ही ट्यूब टायर आणि ट्यूबलेस टायरमध्येही करू शकता.
  • अँटीपंक्चर सोल्यूशन पॉलीमर आधारित जेल असल्यामुळे ते सुकले जात नाही किंवा गोठले जात नाही. ते टायरच्या पंचरला तत्काळ आणि कायमस्वरूपी सील करते.
  • अँटीपंक्चर सोल्यूशन हे 8 एमएम पर्यंत जाड असलेल्या खिळ्यामुळे झालेले पंक्चरही ठीक करू शकते.
  • अँटीपंक्चर सोल्यूशन हे टायरला थंड ठेवते त्यामुळे टायर फुटण्याची भीती नसते.
  • अँटीपंक्चर सोल्यूशनमुळे सारखे सारखे पंक्चर काढण्याचा खर्च आणि एनर्जी टाळली जाऊ शकते.
  • अँटीपंक्चर सोल्यूशन हे विषारी नाही, ज्वलनशील नाही, गंजकारक नाही, हानिकारक नाही त्यामुळे टायर वर त्याचा कोणताही दुष्परिणाम होत नाही. (हेही वाचा: आता ना टायर पंक्चर होण्याची भीती, ना हवा भरण्याची कटकट; कारण बाजारात येत आहे Airless Tires)

अँटीपंक्चर सोल्यूशनचे तोटे -

  • सर्वात महत्वाचे म्हणजे या सोल्युशनमुळे टायर कडक बनते. या द्रवामुळे टायरचा नैसर्गिक मऊपणा निघून जातो.
  • गाडी चालवताना चाकाचा फुगीरपणा जाणवतो व त्यामुळे चालकाला गती मिळवण्यास अडचण निर्माण होऊ शकते. गाडी वेगाने जात असता तुम्हाला स्पीडचा अंदाज येणे अवघड ठरू शकते.
  • अशा प्रकारची सोल्युशन्स टायरचे आयुष्य कमी करतात.
  • मुळात गाडीची गती, आपला अंदाज आणि रस्ते अशा गोष्टी डोक्यात ठेऊन  टायरची निर्मिती केली जाते. त्यामुळे अशा प्रकारच्या सोल्युशनमुळे याचे गणित बिघडू शकते.

तर अशा प्रकारे या सोल्युशनमुळे काही चांगल्या गोष्टी घडू शकतात तर यामध्ये थोडी रिस्कही आहे. त्यामुळे संपूर्ण विचार करूनच तुम्ही अशाप्रकारची सोल्युशन्स आपल्या टायरमध्ये भरा.

(हा लेख इंटरनेटवरील माहितीच्या आधारे लिहिला आहे. लेटेस्टली मराठी यातल्या कोणत्याही गोष्टीची पुष्टी करत नाही)