लॉकडाऊन हटवल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील; जागतिक आरोग्य संघटने चा इशारा
Tedros Adhanom Ghebreyesus (PC - Getty)

भारतात कोरोना व्हायरसने (Coronavirus) थैमान घातले आहे. देशातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतचं आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi)  यांनी देशात 21 दिवसांचे लॉकडाऊन (Lockdown) जाहीर केले आहे. मात्र, आता येत्या 14 एप्रिलला हे लॉकडाऊन संपणार आहे. परंतु, लॉकडाऊन हटवण्याची घाई महागात पडेल, असा इशारा जागतिक आरोग्य संघटनेने (World Health Organisation) दिला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जाहीर करण्यात आलेल्या लॉकडाऊनचे निर्बंध उठवण्यास घाई केली, तर मोठे परिणाम भोगावे लागतील, असंही WHO ने म्हटलं आहे.

डब्लूएचओचे प्रमुख टेड्रोस एडहानोम (Tedros Adhanom Ghebreyesus) यांनी जिनिवा येथील पत्रकार परिषदेत म्हटलं आहे की, 'लॉकडाऊन हटवावं अशी आमचीदेखील इच्छा आहे. मात्र, घाईने लॉकडाऊन संपवण्याचा निर्णय घेतला, तर जागतिक पातळीवर कोरोना बाधितांच्या रुग्णात प्रचंड वाढ होईल. प्रत्येक देशाच्या प्रमुखांनी योग्य उपाययोजना करत लॉकडाऊन सुरु ठेवावे, असंही WHO ने म्हटलं आहे. (हेही वाचा - Hydroxychloroquine च्या निर्यातीला मंजूरी दिल्याने मालदीवचे परराष्ट्रमंत्री अब्दुल्ला शाहिद यांनी मानले भारत सरकारचे आभार!)

दरम्यान, आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबतच्या व्हिडीओ कॉन्फरन्सिंगनंतर महाराष्ट्रातील जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी महाराष्ट्रातील लॉकडाऊन 14 एप्रिलनंतरही कायम ठेवणार असल्याचं जाहीर केलं आहे. त्यामुळे महाराष्ट्रात आता 30 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन असणार आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.